जलस्तर २४१.२५० मीटरवर : बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाहीपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये १५ सप्टेंबरपासून जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. आज धरणातील पाण्याची पातळी २४१.२५० मीटरवर पोहचली आहे. यावर्षी धरणामध्ये २४२ मीटर पर्यंत म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या तरी कोणत्याही गावाला धोका नाही. पण जसे जसे पाणी वाढत जाईल. त्याप्रमाणे बुडीत क्षेत्रातील गावे बुडणार आहेत.मागच्या वर्षी धरणातील जलस्तर वाढविताना २४१.१५० मीटर वर भंडारा जिल्ह्यातील पाथरी गावात धरणाचे पाणी शिरून सावरगाव चारही बाजूने धरणाच्या पाण्याने वेढले होते. वडदमध्ये ही धरणाचे पाणी शिरून रस्ते बंद झाले होते. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, तुडका, गोव्हा, सिर्सी आदी गाात पाणी शिरले होते. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व खा.नाना पटोले यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन करून जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत गाव न सोडण्याचा इशारा शासनाला दिल्यामुळे २४१.१५० मीटर जलस्तरावर पाण्याची पातळी वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोसीखुर्द धरणावर येवून प्रकल्पग्रस्तांसमोर त्यांना पुनर्वसन पॅकेजची घोषणा केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनीही गाव रिकामे करण्याकरिता सहकार्य केल्यामुळे यावर्षी धरणातील जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. २४२ मीटरपर्यंत जलस्तर वाढला तर नागपूर जिल्ह्यातील सात गावांना व १२६४ कुटुंबांना धोका आहे. यातील ४ गावे स्थलांतरित झाली असून तीन गावे शिल्लक आहेत. तसेच ८२४ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४४० कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. २४२ मिटर पर्यंत भंडारा जिल्ह्यातील १७ गावे व २,५०४ कुटुंबांना धोका आहे. यातील ११ गावे स्थलांतरीत झाले असून सहा गावे स्थानांतरीत होण्याचे शिल्लक आहेत. तसेच २०४९ कुटुंबे स्थलांतरित झाले असून ४५५ कुटुंबे अजूनही जुन्या गावातच राहत आहेत. सध्यातरी बुडीत क्षेत्रातील गावांना धोका नाही. पण तरीही सर्व स्थितीवर बारीक लक्ष ठेवूनच धरणाचा जलस्तर वाढविला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणे सुरु
By admin | Published: October 08, 2015 12:24 AM