शेतीनिष्ठ शेतकरी : विविध प्रयोगातून शोधला समृद्धीचा मार्गआमगाव : पारंपरिक धानशेतीला बगल देत वेगवेगळे प्रयोग करण्याची हिंमत दाखवून त्यातून वळद येथील किशोर झाडू रहांगडाले यांनी समृद्ध शेतीचा मार्ग जोपासला आहे. रहांगडाले यांना यासाठी महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ शेतकरी उद्यानपंडित म्हणून गौरविले आहे.आपल्या शेतात बागायती शेतीतून तीन महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न रहांगडाले यांनी काढले. आपल्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी बागायती शेतीकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे शेतकऱ्यांची शेतीपद्धत बदलून आर्थिक स्थिती मजबूत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. वळद येथील शेतकरी किशोर झाडू रहांगडाले हे सतत २५ वर्षापासून आपल्या १४ ते १५ एकर शेतीत विविध आंबे, सागवान, फणस, चिकू याची लागवड करीत आहेत. त्याच्याकडे हायब्रिड आम्रपाली, मालिका, रत्ना तर सुधारित जातीमध्ये लंगडा, दशहरी, चौसा, पायरी, निलम, तोताफल्ली, बैगनपल्ली, कजली, अरकापुनीत, अरकाअरुणा, चंबू, पपैया, निरंजन या विविध जातीच्या आंब्यांची झाडे आहेत. यातून जवळपास चार लाखांचे उत्पन्न त्यांनी यावर्षी घेतले. या उत्पन्नात आणखी भर पडली असती मात्र वादळामुळे आंब्याचा मोहोर, छोटे आंबे गळून पडल्याने त्यांचे नुकसान झाले. याशिवाय क्रिकेट बाल, कालीपत्ती आदी चिकूची ४० झाडे असून त्यांचे उत्पन्न जवळपास ५० हजाराच्या घरात आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवळपास ५० टक्के नुकसान झाले. बागायती शेती पलीकडे जाऊन रहांगडाले यांनी दोन एकरात दोन हजार सागवान झाडेही लावली. त्याला १० वर्षे झाली. आजघडीला त्याची किंमत २० लाख रुपये एवढी आहे. आपल्या नर्सरीतून फलरोपवाटीकेच्या माध्यमातून आंबा कलम, स्वस्त दरात ते शासन योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना पुरवितात. शेतकऱ्यांनी धान शेती कमी करुन बागायती शेती करणे गरजेचे आहे, असे आवाहन करुन धान शेतीला मजूर खर्च जास्त व उत्पन्न कमी असते. तसेच बागायती शेतीत मजूर व खर्च कमी, उत्पन्न मात्र जास्त असते, असा अनुभवत ते सांगतात.किशोर रहांगडाले यांनी आपल्या बागायती शेतात ५० मजूर कामावर ठेवले आहेत. म्हणजे ते २५ कुटुंबांचे पालनपोषण बागायती शेतीतून करतात. त्यांच्या या कार्यात भाऊ आमगावचे कृषी अधिकारी व महाराज बाग येथील अधिकारी गोलीवार यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत असतो. या बागायती शेतीच्या विकासात शासनाकडून विंधन विहिरीकरिता दोन लाखाची तरतूद आवश्यक आहे. रहांगडाले यांना या प्रगतीशील शेतीसाठी कृषी विभागाकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. (तालुका प्रतिनिधी)बागायची शेतीलाविम्याची गरजबागायती शेतीला विमा पाहिजे, असे रहांगडाले यांना वाटते. रत्नागिरी जिल्ह्यात जी विमा पद्धत आहे ती पद्धत या जिल्ह्यात पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही. तहसीलदार, कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी यांनी भेटी देऊन नुकसान भरपाईचा आढावा घेतला. पण योग्य अशी विमा पद्धत नसल्यामुळे नुकसानभरपाई त्या प्रमाणात मिळत नाही, असे त्यांनी सांगितले.
बागायती शेतीतून घेताहेत लाखोंचे उत्पन्न
By admin | Published: May 31, 2015 12:32 AM