भंडारा : गरीब माणसाच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली. या योजनेतील लाभार्थ्यांकडून तात्काळ अर्ज भरून जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रम राबवून प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ गरजुंना मिळवून द्या, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री उज्वला योजनेचा आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय रामटेके, कंपनीचे डिलर व एजन्सीधारक उपस्थित होते. प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना या महिना अखेरपर्यंत गॅस कनेक्शन वाटप सुरू करण्यासंबंधीच्या सूचना खासदारांनी दिल्या आहेत. प्रशासनातर्फे डिलर यांना यादी देण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. या योजनेत महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन देण्याचे ठरविले असले तरी ज्या कुटूंबाकडे कनेक्शन नाही. अशा कुटूंबांना या योजनेत समाविष्ठ करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. उज्वला योजनेत जिल्ह्यातील गरजु महिला व कुटूंब वंचित राहाता कामा नये असे सांगून खा.नाना पटोले म्हणाले, या योजनेतील लाभार्थ्यांकडून पैसे घेतांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचे काटेकोर पालन करण्यात यावे. कुठल्याही लाभार्थ्यांकडून अनावश्यक व अवाजवी रक्कम घेता कामा नये, असे निर्देश दिले. उज्वला योजनेची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी कंपन्यांनी जनजागृती करावी व योजना लाभार्थ्यांना समजावून सांगावी, असे त्यांनी सांगितले. कंपन्यांचे विक्री अधिकारी व गॅस एजन्सीधारकांनी समन्वयानी काम करून प्रामाणिक व गरीब व्यक्तीपर्यंत उज्वला योजनेचा लाभ पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. या योजनेत दलालांना अजिबात थारा देऊ नका. ज्या डिलरच्या भागात योजना राबविताना हयगय होईल, त्याची जबाबदारी त्या त्या डिलरवर राहील, असे निर्देश दिले. प्रधानमंत्री उज्वला योजना ही गरीबाच्या हिताची योजना असून गरजु लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहनही खा. पटोले यांनी केले. मुबलक खतसाठा यावर्षी जिल्ह्यात मुबलक खतसाठा आहे. खताचे दरही ७५ रूपयांनी कमी झाले आहेत. युरीया आणि मिश्रखतही मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कुठे फसवणूक होत आहे, असे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ गरजूपर्यंत पोहचवा
By admin | Published: July 16, 2016 12:44 AM