उन्हाळा म्हणताच, अंगातून घामाच्या धारा निघतात. त्यातही मार्च व एप्रिल महिना कसा तरी निघून जातो. मात्र, सर्वाधिक तापणारा मे महिना कसा असणार, हा विचार करूनच अंगाची लाहीलाही होते. मे महिन्यात सूर्य सर्वाधिक तळपत असून, यालाच ‘मे हीट’ म्हटले जाते. मे महिन्यातील उन्हाचा तडाखा असह्य राहत असून, कसा तरी हा महिना निघून जावा, अशीच प्रार्थना सर्व करीत असतात. त्यातच सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांचा नवतपा मे महिन्यातच येत असल्याने, सर्वांच्या अंगाला थरकापच सुटतो. यंदा मात्र, ढगाळ वातावरण व पावसाच्या आगमनाने जिल्ह्यात मे महिन्यात सूर्यदेव पाहिजे तसे तापले नाही. परिणामी, मे महिन्यात पडणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून जिल्हावासीयांची सुटका झाली. जिल्ह्यातील तापमान बघितले असता, ४० अंश सेल्सिअसच्या आतच दिसून आले. म्हणजेच, दरवर्षी ४० पार जाणारा पारा यंदा सामान्य राहिल्याचे दिसले व त्यामुळे मे महिना थंडाथंडाच निघाला. आता उरलेले दिवसही अशेच ढगाळ वातावरणात निघून जावेत, अशीच सर्वांची इच्छा आहे.
ढगाळ वातावरणामुळे ‘मे हीट’पासून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:39 AM