पवनी : तालुक्यातील सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील खरीप हंगामातील भातपिकाचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या क्षेत्रातील शेतीला उजव्या कालव्याचे पाण्यामुळे गेली. दोन वर्षे उन्हाळी पिकासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी यापुढे नियमित पाणी मिळेल अशा आशेवर होते. मात्र यावर्षी उन्हाळी भातपिकासाठी उजव्या कालव्याचे पाणी मिळणार नाही,असे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीचे पत्र परिसरातील गावात लावण्यात आल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झालेला आहे.परिसरातील कोदूर्ली, रेवनी, धानोरी, भोजापूर, सिंधी, गुडेगाव, खातखेडा, सेंद्री, सोमनाळा व सावरला गावातील शेतकऱ्यांचे पावसाळी भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांची परिस्थिती सावरण्यासाठी पर्याय म्हणून उन्हाळी भातपिकाची शेती करणे आवश्यक आहे तरी देखिल उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पत्रक काढून उन्हाळी भातपिकाला पाणी मिळणार नाही, असे सुचित केले. शेतकऱ्यांना उन्हाळी फसल घेण्यासाठी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी मुन्ना तिघरे यांचे नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ कार्यकारी अभियंत्यांना भेटले. चर्चा करून निवेदन दिले. त्यात आठ दिवसात निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आलेला आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे मुन्ना तिघरे, दिलीप हटवार, मंगेश काटेखाये, राजू जिभकाटे, सुखदेव दोडेवार, हिनराज अंकतवार, अशोक काटेखाये, दशरथ काटेखाये, भाग्यवान भाजीपाले, सुधीर कोरेकर, अशोक वैद्य, आशीष वैद्य, सेवक तिघरे, प्रकाश तिघरे, रमेश तिघरे, शंकर बोकडे, युवराज तिघरे, राजू घुटके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
उन्हाळी भातपिकाकरिता उजव्या कालव्याचे पाणी मिळावे
By admin | Published: October 28, 2016 12:31 AM