अनुदान रखडले, लाभार्थी संतप्त
तुमसर : तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत क्षेत्रातील हजारो लाभार्थी प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत. लाभार्थ्याने अनुदान आठ दिवसांत खात्यावर जमा करण्यासंबंधी तुमसर खंडविकास अधिकारी यांना इशारा दिला होता. अद्याप घरकूल लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा न झाल्याने संतप्त झालेल्या सिलेगाव व इतर गावांतील लाभार्थ्यांनी तुमसर पंचायत समिती कार्यालयावर धडक देऊन आंदोलन केले.
प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकूल लाभार्थ्यांच्या खात्यात एक लाख ४८ हजार रुपये इतकी रक्कम जमा केली जाते. हे अनुदान टपरी जमा केले जाते. अनुदानांतर्गत एक लाख तीस हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात. उर्वरित १८ हजार रुपयांचे अनुदान हे मग्रारोहयो अंतर्गत मजुरांच्या नावे काढले जाते. परंतु मागील दोन महिन्यांपासून तुमसर तालुक्यातील सिलेगावसह ९६ ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री घरकूल योजनेचे अनुदान व मग्रारोहयो अंतर्गत मजूर वेतन १८ हजार रुपयांचे अनुदान स्थगित आहे. ही रक्कम जमा न केल्याने सिलेगाव पंचायत समिती क्षेत्रातील लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. सिलेगव येथील समस्या दूर करण्याची मागणी आंदोलन करताना केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, खंडविकास अधिकारी धीरज पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान रक्कम लवकरात लवकर जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
या वेळी छावा संग्राम परिषदेचे महामंत्री हिरालाल नागपुरे, तालुकाध्यक्ष बालकदास ठवकर, प्रफुल वराडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक खरवडे, राजकमल तुमसरे, सुजित पेरे, महादेव गौतम, हरिश्चंद्र शेंद्रे, भरतलाल पारधी, पुरुषोत्तम रहांगडाले, राजू पेरे, शैलेश पगारे, राम मारबते, नीलकमल पारधी, राजेश येडे, महादेव शरणागत, कार्तिक गुरवे, ज्ञानेश्वर उके, आकाश पटले, केशवराव पटले व ओबीसी, छावा संग्राम परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.