तुमसर: येथील बोसनगरातील गणेश भवन इमारती जीर्ण झाल्याचे दाखवून पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी ११ गाळेधारक व प्रशासनाचीतहसील कार्यालयात सुनावणी झाली. मात्र मुख्याधिकारी व ट्रस्ट मालक अनुपस्थित होते. दरम्यान इमारत पाडण्यासाठी पोलीस व प्रशासकीय मदतीची मागणी करण्यात आली असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी अभिप्राय मागितला आहे.
बोसनगर येथे गणेश भवन इमारत असून या इमारतीत दहा दुकानदारांचा ४० वर्षांपासून व्यवसाय सुरू आहे. तसेच सदतीस वर्षापासून जनता कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहे. सदर इमारत ट्रस्टची असून इमारतीची स्थिती उत्तम आहे. इमारतधारकाने इमारत ६५ ते ७० वर्षे जुनी असून जीर्ण झाल्यामुळे बांधकाम पाडण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. त्यामुळे दहा दुकानदारदारांचे व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. शाळेमध्ये ३५० विद्यार्थी शिकत आहेत. इमारत पडल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे पर्यायी व्यवस्था करण्याचे कोणतेही निर्देश यापूर्वी इमारत मालकांनी दिले नाही.
गणेश भवन प्रकरणी तहसीलदार बी. डी. टेळे यांनी दहा दुकानदार व शाळा प्रशासनाची बाजू एकूण घेतली. दुकानदारांनी सदर प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याची माहिती दुकानदारांनी तहसीलदारांना दिली.
सुनावणीदरम्यान मुख्याधिकारी व इमारत मालकाचे प्रतिनिधी अनुपस्थित होते त्यामुळे येथे एकतर्फी निर्णय देण्याची गरज आहे. त्यांना दुसरी संधी देण्यात आली आहे.
इमारतीची विक्री
संबंधित मालकाने ही इमारत विक्री केल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे इमारत जीर्ण दाखवून ती भुईसपाट करण्याचा घाट येथे बिल्डरांनी केला आहे. दुकानदार व शाळेला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा दुकानदारानी दिला आहे. सुनावणी दरम्यान दुकानदार डॉ.चंद्रशेखर भोयर, मोहन दुपारे, जयशंकर भोंगाळे, प्रेमचंद शर्मा, नारायण संभावणी, संजय वर्मा, महेश डोहळे, प्रकाश कुंजेकर, भरतकुमार सोनकर, प्रा. विद्यानंद भगत उपस्थित होते.