रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथील मुंबई-हावडा मुख्य रेल्वे ट्रॅकवर गर्डर लाँचिंगचे काम शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आले. या वेळी दोन गर्डर लाँच करण्यात आले. उर्वरित तीन गर्डर लाँचिंग करण्यात येत आहेत. शुक्रवारी रात्री रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकवरील विद्युत पुरवठा खंडित करून इंजीनचे काम केले. पहाटेपर्यंत सदर काम सुरू होते. दोन महाकाय हायड्रा मशीनने लोखंडी गर्डर उचलून रेल्वे ट्रॅकवरील दोन्ही बाजूला असलेल्या सिमेंट कॉलमवर अचूक ठेवले. या वेळी रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३६ मीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवरील लोखंडी महाकाय गर्डर लाँचिंगवेळी कुतूहल म्हणून स्थानिक तथा ये-जा करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते. गत पाच वर्षांपासून येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. गर्डर लाँचिंगचे मुख्य काम करणे मोठे आव्हानात्मक होते. परंतु रेल्वे प्रशासनाच्या अभियंत्यांनी हे काम अतिशय योग्यरीत्या केले. गर्डर लाँचिंग झाल्यानंतर त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. रेल्वेची कामे पूर्णत्वास आल्यानंतर इतर उड्डाणपुलाची कामे लवकर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.