भंडारा येथील घटना : तरुणीला नागपूरला हलविलेभंडारा : घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन तरूणीवर धारदार शस्त्राने वार केला. यात ही तरूणी गंभीररित्या जखमी झाल्यानंतर चोरट्याने घरातील लॉकर फोडून सोन्याचे मंंगळसूत्र, कानातील झुमके, रोख रक्कम व लॅपटॉप चोरून नेला. या घटनेत जखमी झालेल्या तरूणीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. ही घटना गुरूवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरातील म्हाडा कॉलनी येथे घडली. अश्विनी रवींद्र शिंदे (२०) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणीचे नाव असून ती नागपूर येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे. शहरातील म्हाडा कॉलनीत रविंद्र शिंदे (५५) यांचे घर आहे. शिंदे हे कृषी विभागात कार्यरत असून आई राजश्री शिंदे या धारगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारला हे दाम्पत्य आपआपल्या कामावर गेले होते. लहान मुलगा शाळेत गेला होता. अश्विनी ही घरात एकटीच होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटे शिंदे यांच्या घरी आले. दारावर थाप दिल्यानंतर अश्विनीने दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने तिला पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी ती आत गेली असता चोरट्याने घरात प्रवेश करून अश्विनीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर तिने किंचाळले. तिच्या किंचाळण्याच्या आवाजामुळे शेजारचे शिंदे यांच्या घरी पोहोचले. परंतु, तेवढ्या वेळात चोरट्याने लॉकरमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व लॅपटॉप घेऊन पळ काढला होता. शेजारचे आले तेव्हा अश्विनी रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळ गाठून शोधमोहिम सुरू केली आहे. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. परंतु, श्वानपथकाला चोरट्याचा मार्ग काढण्यात अपयश आले. पोलिसांनी अश्विनीच्या रक्ताचे नमूने, डोक्याचे केस व चष्मा ताब्यात घेतला आहे. पोलिसांचे पथक चोरट्याच्या मार्गावर असून तपास पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार हे स्वत: करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
तरुणीवर शस्त्राने हल्ला
By admin | Published: July 31, 2015 12:58 AM