भंडारा : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने खचलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले होते. अभ्यास करूनही इतके कमी गुण कसे मिळाले, या विचारातून ती तणावाखाली होती, यातूनच तिने हा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना सेलोटी रोड, लाखनी येथे बुधवारी सायंकाळी घडली.
मयुरी किशोर वंजारी (वय १८) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती लाखनीच्या समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. बुधवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल घाेषित झाला. त्यात मयूरीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले. वर्षभर अभ्यास करूनही कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. याबाबत तिने कुणालाही काही सांगितले नाही. दरम्यान, ४ वाजेच्या सुमारास मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले.
तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ५ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मयूरीचे वडील फर्निचर कामगार म्हणून काम करतात. तिच्या मागे आई, वडील, माेठी बहीण आणि लहान भाऊ, असा परिवार आहे. मयूरीने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.