भंडारा : घरात आनंदाने उड्या मारणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीचा गरम दुधाच्या भांड्याला अचानक धक्का लागला आणि काही कळायच्या आत ती वडिलांच्या डोळ्यासमोर दुधाच्या भांड्यात पडली. गंभीररित्या भाजलेल्या चिमुकलीचा १८ दिवसांच्या उपचारानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मोहाडी तालुक्याच्या सातोना येथे घडली. याप्रकरणी वरठी ठाण्यात मंगळवारी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.
दिया गुरुप्रसाद वंजारी (३) रा. सातोना, ता. मोहाडी असे मृत चिमुकलीचे नाव आहे. गुरुप्रसाद वंजारी यांचा दही-दूध विक्रीचा व्यवसाय आहे. गावातून दूध संकलन करून घरीच दही, लोणी तयार करून ते विकतात. १५ एप्रिल रोजी गावातून दूध संकलन करून गुरुप्रसाद यांनी नेहमीप्रमाणे दूध गरम केले. चुलीवरून भांडे उतरून दूध थंड करण्यासाठी ठेवले. ते समोरच जेवायला बसले. दरम्यान मुलगी दिया जवळच आनंदाने खेळत होती. वडिलांना आवाज देत होती. आनंदात उड्या मारताना अचानक दुधाच्या भांड्याला तिचा धक्का लागला. काही कळायच्या आतच वडिलांच्या डोळ्यादेखत ती गरम दुधाच्या भांड्यात पडली.
वडिलांनी जेवणाचे ताट बाजू सारत तत्काळ तिला बाहेर काढले. सरळ भंडाऱ्याचे शासकीय रुग्णालय गाठले. गरम दुधात पडल्याने दिया ६७ टक्के भाजली होती. भंडारा येथे उपचार शक्य नसल्याने तिला नागपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र १८ दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी वरठी ठाण्यात नागपूर पोलीस ठाण्यातून कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.
१८ दिवस मृत्यूशी झुंज
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार शक्य नसल्याने दियाला नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ६७ टक्के भाजलेली दिया उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. ३ मे रोजी तिची मृत्यूशी सुरू असलेली १८ दिवसांची झुंज संपली. प्राणापेक्षा जास्त जपलेली चिमुकली लेक दिया डोळ्यादेखत गेली. तिच्या अचानक जाण्याने वंजारी परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. वंजारी परिवार अद्यापही या दु:खातून सावरलेला नाही.