भंडारा : महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये भंडारा जिल्ह्यातील खेळाडू चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत उत्तम सांघिक खेळ करुन यश संपादन करतील याची खात्री आहे. या क्रीडा स्पधामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण झाली असून ही भावनाच आपल्या जिल्ह्याला पुढे घेवून जाणारी आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. शिवाजी क्रिडा संकुल येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा महसूल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नीने दिप प्रज्वलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, परिवीक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी पवनीत कौर उपस्थित होत्या. स्पर्धांमध्ये गोळाफेक, थालीफेक, कॅरम, १००, २००, ४०० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, टेबल टेनिस, क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, कब्बडी इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये भंडारा, तुमसर व साकोली उपविभाग आणि जिल्हाधिकारी संघ यांच्या मध्ये सामने झाले. या मधील विजेते संघ विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. कब्बडी व किकेट मध्ये तुमसर उपविभाग, हॉलीबॉलमध्ये जिल्हाधिकारी संघ, खो-खो उपविभाग भंडारा या संघांची चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पधेसाठी निवड झाली. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये टेबल टेनिस प्रदिप वडीचार, गोळाफेक सुरेश मल्लेवार, भालाफेक सुरेश मल्लेवार, गोळाफेक (महिला) आशा कुर्वे, बुध्दीबळ व कॅरम एन.एस. सुरवसे, पुरुष बॅडमिंटन महेश मानकर, बॅडमिंटन (दुहेरी) मध्ये इंदर गुजर आणि नरेंद्र पल्ले, बॅडमिटंन (महिला) पवनीत कौर, बॅडमिंटन दुहेरी पवनीत कौर व इंदू कुथे, भाला फेक (महिला) अर्चना देशमुख, गोळाफेक शिल्पा डोंगरे, थाळीफेक अश्वीनी जाधव यांची निवड झाली. या सर्व विजेत्यांना विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलागुणांचा आविष्कार केला. यामध्ये रवि भावसागर यांनी रचलेली व सादर केलेली कव्वाली विशेष आकर्षण ठरली. अर्चना देशमुख यांनी ‘रेशमाच्या रेघांनी’ या गीतावर सादर केलेल्या लावणीने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तलाठी खान यांनी सादर केलेले ‘वो मेरे दिल के चैन’ या सिनेगीताला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. स्त्रीभ्रूण हत्येवर संगीत नाटकाने प्रेक्षक भावुक झाले. संचालन तहसीलदार पोहनकर यांनी केले. आभार नायब तहसीलदार थोरवे यांनी मानले. (प्रतिनिधी)
सांघिक खेळातून जिल्ह्याला यश मिळवून द्या
By admin | Published: February 03, 2016 12:42 AM