जानकाबाई उजवणे असे या महिलेचे नाव आहे. गत १८-२० वर्षांपासून ती भंडारा शहरातील प्रगती कॉलनीत अनेकांकडे धुनेभांडी करते. घराघरात घडणारे रामायण, महाभारत, एकमेकांच्या घरात डोकावून पाहणारे शेजारी, उणीदुणी शोधून मिडीयापेक्षाही वेगाने बातम्या पोहचविण्यात टपून बसलेली आजुबाजूची चालती बोलती वृत्तपत्र. या कोणत्याच भानगडीत न पडता इकडची बातमी तिकडे आणि तिकडची बातमी इकडे न करता घरातीलच सदस्य होवून जाणारी जानकाई इतरांपेक्षा वेगळीच. साधे राहणीमान, मीतभाषी असणाऱ्या जानकाबाई सर्वांना आपल्याशा वाटतात. गरीब असले तरी इमानदारी हीच माझी श्रीमंती, असे त्या सांगतात. बरेचदा सोन्या नाण्याच्या वस्तू सफाई करताना हाताला लागतात. पण त्या आपण प्रामाणिकपणे परत केल्या. त्यामुळेच माझी घर अनेक वर्षापासून टिकून आहे, असे जानकाई अभिमानाने सांगतात.
अशा या जानकाईचा श्रमाचा गौरव प्रगती कॉलनीतील ररिवाशी आणि लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या शिक्षिका स्मीता गालफाडे यांनी केला. जानकाईचा वाढदिवस आपल्या घरी साजरा करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला आणि इतरांसमोर नवा आदर्श निर्माण केला. माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण कधीच विसरू शकत नाही, असे मत जानकाबाई उजवणे यांनी सांगितले.
बॉक्स
कष्टकरी हाताला बळ
वंचितांच्या जीवनात आनंद पेरण्याचे, मुद्दाम ठरवून चार दोन आनंदाचे क्षण वाटण्याचे काम प्रत्येकाने करायला हवे. आपल्या घराच्या आपल्या प्रगतीला हातभार लावणारे अनेक हात असतात. त्यातही कष्टकरी हाताला बळ देणारे क्षण जुळवून आणले तर समाजातच्या दुर्लक्षित घटकांनाही जगन्याचे पाठबळ मिळेल, असे शिक्षिका स्मीता गालफाडे यांनी सांगितले.