राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावकरी शिस्तीत वागतात. स्मशानभूमीवरही जाण्यासाठी रांगेत आपोआप लागतात. हे वाचून धक्का बसेल. पण, हे खरं आहे. मुरमाच्या रस्त्यावर माती घातली गेली. तो रस्ता चिखलमय होतो. एक किलोमीटर चिखलातून पायवाट काढत अंत्यसंस्कार करण्याच्या स्थळावर पोहचण्यासाठी चक्क रांगेत लागावे लागते, असा आश्चर्यकारक चित्र कान्हळगाव (सिरसोली) येथे बघायला मिळते.रोजगार देण्याच्या नावाखाली गावखेड्यातील चांगले रस्ते चिखलमय करण्याचा संतापजनक प्रताप अनेक ग्रामपंचायतीकडून होत आहे. असाच प्रकार कान्हळगाव ग्रामपंचायतीने केला आहे. कान्हळगाव येथील हरण्याघाट, तितीरमाऱ्या घाट हे दोन रस्ते मुरमाने पक्के करण्यात आली होती. मुरुममिश्रीत चांगल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने मातीकाम केले. मातीकाम झालेले हे पक्के रस्ते चिखलमय झाले आहेत.कान्हळगाव येथे ऑगस्ट महिन्यात तीन जणांचे निधन झाले. या तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हरण्याघाटावर नेण्यात आले. पावसाळा असल्याने हरण्याघाटचा रस्ता पूर्णत: चिखलमय झालेला आहे. हरण्याघाटावरील नदीवर पोहचण्यासाठी लोकांना एक किलोमीटर चिखल तुडवत जावे लागते. चिखलमय रस्त्यातून एक पायवाट काढली जाते. अंत्यसंस्कारासाठी बाहेरून आलेले आप्तेष्ट व गावकरी हरण्यानदीवर पोहचत पर्यंत सगळे एका रांगेत चालतात.चिखल तुडवत सर्वच लोक शिस्तीत रांगेत येतात. चिखलमय रस्त्याने रांगेत चालण्याची शिस्त लावून दिली अशी उपरोधीक प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली. भर पावसाळ्यात चारचाकी, मोटारसायकल, सायकल नदीपर्यंत पोहचत होती. आता त्या रस्त्याने चालणे अवघड होत असल्याचे चित्र आहे. दररोज शेतीवर जाणाऱ्या या चिखलमय रस्त्याचा
दररोजचा प्रवास करावा लागतो.रोजगार हमी योजनेत कोणते रस्ते घ्यावे, घेऊ नये याचे नियोजन ग्रामपंचायतने केले नाही. त्यामुळे हरण्या घाट व तितीरमाºया रस्त्याने जाणाºया शेतकऱ्यांना दररोज चिखलातून पायवाट काढण्याचा त्रास सहन करावा लागतो. आता मातीकामाची गरज नव्हती. चांगले रस्ते मातीमय झाले. आता पुन्हा या मुरुम रस्त्यावर माती जबरदस्तीने पाडली गेली. त्यानंतर मुरुम पडणार काय की हा त्रास असाच सहन करावा लागणार असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत.