पवनी : यशाची अपेक्षा प्रत्येजन बाळगत असतो. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुद्धा सुरू असतात. परंतु सर्वांनाच यश मिळते असे नाही. यशाचे शिखर गाठायचे असेल तर आत्मविश्वास बाळगणे हा उपाय आहे. आत्मविश्वासाचे बळावर ध्येय साध्य होते, असे विचार गटशिक्षणाधिकारी श्यामकर्ण तिडके यांनी व्यक्त केले.टेम्पलसीटी एज्युकेशन सोसायटी पवनी द्वारा संचालित रेनबो इंग्लीश स्कूलचे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी बालवयात चांगल्या सवयी लावाव्या. शिक्षक व पालकांनी त्यांचेवर चांगले संस्कार करावे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष उर्मिला महादुले उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक पारधी, संस्थेचे सदस्य डॉ. प्रभाकर लेपसे, प्रगती महादुले, प्राचार्य गिता तिघरे उपस्थित होते. रांगोळी स्पर्ध, पुष्प सजावट प्रदर्शनीचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. दृढनिश्चय, आत्मविश्वास व परिश्रम करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी बालवयापासून सुरू करावी तसे स्वत:मध्ये असलेले सुप्त गुण शिक्षक-पालकांपासून लपवून ठेवू नये, असे विचार अशोक पारधी यांनी व्यक्त केले. पालकांनी मुलांच्या गृहपाठात सहकार्य करावे, असे मत डॉ. प्रभाकर लेपसे यांनी व्यक्त् केले. प्रगती महादुले यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्या गिता तिघरे यांनी संचालन तबस्सुम खान, शारदा अंबादे यांनी तर आभार पल्लवी मानमोडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
आत्मविश्वासाचे बळावर ध्येय साध्य
By admin | Published: January 01, 2015 10:57 PM