लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट अद्यापही साध्य न झाल्याने विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील उर्वरित लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे व ज्या नागरिकांचा अद्यापही दुसरा डोस प्रलंबित आहे, त्या नागरिकांना फोनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज लसीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत दिले.लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डॉ. माधुरी माथूरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.ओमायक्रॉन विषाणूचा देशात व राज्यात संसर्ग आढळून आला आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असून, सध्या तरी कोरोनावर लस हाच एकमेव पर्याय आहे. लसीकरणामुळे मृत्यूदर कमी आहे. त्यामुळे लसीकरणाला गती द्यावी व शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी व लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले.लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या; परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण शिल्लक आहे. त्याठिकाणी कॅम्पचे आयोजन करावे. २४ ते ३१ डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत रविवारीसुद्धा लसीकरण सुरू ठेवावे. जिल्ह्यात जवळपास २०० लसीकरण केंद्राद्वारे लसीकरण होणार असून, कॅम्पच्या अगोदरच्या दिवशी ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत बैठका घ्याव्यात व लसीकरणाबाबत जनजागृती करावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी गावातील नागरिकांना लसीकरणाबाबत समुपदेशन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला; परंतु अद्यापही दुसरा डोस घेतला नाही, अशा नागरिकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही लस न घेणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे माहिती देण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही कदम यांनी केले.
स्वत:हून पुढे या- लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच भविष्यातील ओमायक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर आशा, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून लस घ्यावी.