आषाढी पौर्णिमा : गावाच्या शांतीसाठी होते मोहगावदेवीत गावपूजन, पुरातन परंपरा आजही कायमराजू बांते मोहाडीदेवा गावचं भलं कर, पाऊस पाड, गावातली रोगराई दूर कर तसेच गावात एकोपा शांती नांदू दे, अशी आराधना करण्यासाठी गावातील विविध देवांपूढे मोहगाव (देवी) येथील गावकरी एकत्र येवून गावपूजा केली. अशा गावपूजेची संस्कृती जपण्याचे कार्य परंपरेने पूरातन काळापासून सुरु आहे.शक्तीमातेचे मंदिर असलेले मोहगाव (देवी) हे गाव प्रसिध्द आहे. चार हजार एवढ्या लोकसंख्येचं हे गाव आहे. या गावात मागील काही पिढ्यांपासून गावातील व गाव शेजारील असलेल्या मारुती मंदिर, मातामाय, दैतराजा, बलकीदे, नागठाणा, मशासूर, सुरनदी आदींची गावकरी एकत्र येवून गावपूजा दरवर्षी आषाढी पौर्णिमेला करतात. गावात एकोपा नांदावा, शांती राहावी, गावातली रोगराई नष्ट व्हावी, पाऊस पडावा यासाठी विविध मंदिरात जावून पूजा आरती करतात. गाव पूजेचा सन्मान गावातील सरपंचांना असतो. तसेच गावातील ग्रामपंचायतीची सदस्य मंडळी, वृध्दमंडळी गावपूजेसाठी एकत्र येतो. पूरातन काळापासून ते सात-आठ वर्ष सोडली तर दैतराजा, बल्कीदेव, मशासूर व नदीच्या वाहत्या पात्रात बकरे किंवा अन्य पशूंची बळी देण्याची प्रथा मोहगाव देवी गावात सुरु होती. गावपूजेसाठी वर्गणी गोळा केली जात होती. त्या वर्गणीतून पूजा साहित्य व बकऱ्या कोंबड्यांची खरेदी केली जायची. गावपूजा झाल्यावर कधी सामूहिक तर कधी तर भाजी नेवून गाव जेवण करण्याची परंपरा होती. रुढी, परंपरेचं बर-वाईट गावातील प्रतिष्ठित समजू लागले.सात आठ वर्षापुर्वी सरपंच राहिलेले स्वर्गीय कुंडलिक लेंडे यांनी देवाच्या नावावर समुहाने होणारी पशुहत्या बंद केली. ती बंदी आजही कायम आहे. तथापी, आजही काही गावकरी निष्ठेने वैयक्तिकपणे बकरे कोंबडे दैतराजा या देवाला बळी देतात. विशेषत: मोहगाव (देवी) येथून नवख्या मुली लग्न होवून सासरी जातात. त्या मुलींचे पती (गावजवाई) मोहगाव (देवी) येथे आषाढी पौर्णिमेला येवून दैतराजा देवावर नारळ फोडतात. काही जावई कोबंड्याचा बळी देतात.मोहगाव (देवी) या गावाला टोली आहे. त्या टोलीवर मोहगाव देवी वासींयाच श्रध्दास्थान गणेशपूरी आहे. या गणेशपूरीवर पूर्वी यात्रा भराची. दिंडी, भजन, पूजन होत असे. मोहगाव (टोली) वरील प्रभूजी शहारे सांगतात, चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वी गावात रोगराईने थैमान घातले होते. रोगाने सारेच गावकरी त्रस्त झाले होते. काय कराव गावकऱ्यांना समजेना. गावातील प्रमुखांनी नागपूर स्थित असलेले महाराज गणेशाम नंदपूरी यांचेकडे जायचे. त्यांच्याकडून गावात शांतीयज्ञ करायच असं ठरल. ठरल्याप्रमाणे गणेशपूरी वर यज्ञ करण्यात आले. गाव पूर्ववत शांत झाला. गावातील रोगराई पळाली. तेव्हापासून गावात रोगराई आली नाही. गावात एकोपा व शांती आहे. त्यामुळे मोहगाव (टोली)वर असलेल्या गणेशपूरीवर आषाढी पौर्णिमेच्या दिवशी श्रध्देने गावकरी पूजा करतात.आजही पंरपरागत असलेली गावपूजा मोहगाव देवी येथे आषाएी पौर्णिमेला सकाळपासून गावातील व गावच्या सीमेवरील सर्व देवांची सामूहिक पूजा केली जाते. मारुती मंदिरात सरपंच राजेश लेंडे यांनी गावाच्यावतीने पूजा अर्चा केली. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. पशुहत्या ही प्रथा बंद झाल्याने गावातील जनतेला प्रसाद देण्यासाठी शिरा केला गेला. पावसान दडी मारली आहे. यासाठी मोहगावदेवी वासियांनी वरुणराजाला आर्त हाक दिली. देवा पाऊस पाड, पीक भरघोष येवू दे.
देवा ! पाऊस पडू दे, रोगराई टळू दे...
By admin | Published: August 01, 2015 12:12 AM