भंडारा : सासूने सोन्याची नवीन अंगठी तयार करण्यावरून झालेल्या वादात सुनेने आंघोळीसाठी गरम केलेेले पाणी सासूच्या अंगावर ओतल्याची घटना भंडारा शहरातील रामनगरातील किसान चौकात घडली. यात सासू गंभीररीत्या जखमी झाली असून, सुनेविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पा ओमप्रकाश गभणे (६५), रा. रामनगर किसान चौक असे जखमी सासूचे नाव आहे, तर अलका अरविंद गभणे (३७), असे सुनेचे नाव आहे. पुष्पा गभणे यांनी आपल्यासाठी जुन्या सोन्याच्या अंगठीमध्ये एक ग्रॅम नवीन सोने टाकून अंगठी तयार केली. ३ सप्टेंबर रोजी सुनेने वाद घातला. माझ्या मुलाला अंगठी का तयार करून दिली नाही, असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. याच भांडणात घरातील गॅसवर आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अलकाने सासूच्या अंगावर ओतले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तत्काळ भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सून अलका गभणेविरुद्ध भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बोरकुटे करीत आहेत.