लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात १४ एप्रिलपासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ लागू करण्यात आल्याने गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात बंदोबस्ताचे नियोजन करून बंदोबस्त लावण्यात आला होता.
दिनांक १५ एप्रिल रोजी रात्री गोंदिया जिल्ह्यातील के. टी. एस. हॉस्पिटल व इतर खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन अल्प प्रमाणात शिल्लक होता. तो संपल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्वतः पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तत्काळ कारवाई करून के. टी. एस. रुग्णालय तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे योग्य तो बंदोबस्त नेमला. शहरातील व जिल्ह्यातील सर्व कोविड हेल्थ सेंटरमध्ये असलेले रुग्ण, ऑक्सिजन सिलिंडरचा साठा व ऑक्सिजनचा साठा कमी पडल्यास त्याची उपाययोजना यांचा आढावा घेतला. जिल्ह्याला बालाघाट (मध्यप्रदेश) येथून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने ऑक्सिजन पुरवठा वाहनास अडथळा होऊ नये म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या सीमेपासून के. टी. एस. रुग्णालयापर्यंत पोलीस संरक्षणात आणण्यात आले.
पोलीस अधीक्षक पानसरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एक जबाबदारी म्हणून महसूल विभागातील अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, ऑक्सिजन पुरवठाधारक यांच्याशी योग्यवेळी समन्वय साधून उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता खबरदारी घेतली. पहाटे ३ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, तहसीलदार गोंदिया शहर, तहसीलदार गोंदिया ग्रामीण, पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, रामनगरचे ठाणेदार प्रमोद घोंगे हे के. टी. एस. रुग्णालय येथे उपस्थित होते.