पालांदूर (चौ.) : आधीच घरच्यांचा विरोध आणि त्यात कोरोनाचे संकट. अशा परिस्थितीत गावकऱ्यांच्या पुढाकाराने एका प्रेमी युगुलाचे शुभमंगल पार पडले. लाखनी तालुक्यातील वाकल ग्रामपंचायतीत अवघ्या सात सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
वाकल येथील प्रफुल बावणे याचे मनीषा या तरुणीशी चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते. मात्र दोन्ही कुटुंबांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. पळून जाऊन लग्न करावे तर कोरोनाचे संकट आणि इकडे घरच्यांचा विरोध. अशा स्थितीत काय करावे ही विवंचना या दोघांनाही सतावत होती.
मोठी हिंमत करून वाकलचे सरपंच टिकाराम तरारे यांना आपली प्रेमकहाणी सांगितली. सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही परिवाराची भेट घेतली. लग्नाविषयी चाचपणी केली. परंतु दोन्ही परिवाराचा स्पष्ट नकार मिळाला. इकडे प्रफुल व मनीषा लग्न करण्यावर ठाम होते. शेवटी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत यांनी या प्रेमी युगुलाचा विवाह सोहळा साध्या पद्धतीत पार पाडण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात अगदी साध्या पद्धतीने आणि कोरोना संसर्गाचे नियम पाळून बुधवारे शुभमंगल पार पडले. या लग्नाची वार्ता गावात पसरली. परंतु संचारबंदी असल्याने कुणीही फिरकले नाही. परंतु गावभर या लग्नाची चर्चा मात्र चवीने चर्चिली जात आहे. या सोहळ्यासाठी सरपंच टिकाराम तरारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयपाल कोचे, उपसरपंच नरेश कोचे, सदस्य उषा साखरे, सुनीता बावणे, सुनीता जनबंधू, शांताबाई बोरकर यांनी पुढाकार घेतला.