विरली : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेला या परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत परिसरातील ६८ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, १५ टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत.
या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विरली (बु.) , ईटान, कऱ्हांडला , विरली (खुर्द) अशी चार गावे येतात. या चार गावांमध्ये एकूण ५ हजार १२४ अठरा वर्षांवरील नागरिक आहेत. यापैकी ३ हजार ४८८ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ७८८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मार्च महिन्यापासून सुरू असलेली ही लसीकरण मोहीम सध्या अधिक गतिमान झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शासनाने लसीकरण मोहिमेला वेग दिला असून, या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आता शिक्षकांनाही सामील केले आहे.
या लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विरली उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक बन्सोड, आरोग्य सेविका सुषमा बांगळकर, साठवने , सामुदायिक आरोग्य अधिकारी किरण डोरले, बनकर, आरोग्यसेवक गिऱ्हेपुंजे, आशा स्वयंसेविका उर्मिला कोरे, निशा जांगळे, वर्षा ढोरे, छाया आडीकने ,विरली (बु.) जि. प. शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. वंजारी, सहायक शिक्षक प्रकाश पारधी, अविनाश मस्के, खापर्डे, मालती शेंडे, गाढवे आदी सहकार्य करीत आहेत.