भंडारा: ॲमेझॉन कंपनीच्या साहित्य भरलेल्या कंटेनरमधून किमत २३ लाख १९ हजार ८३३ रुपयांचे किमतीचे साहित्य चालक व वाहकाने संगनमत करून लंपास केल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर लाखनी तालुक्यातील मानेगावजवळील पेट्रोल पंपाच्या समोर उघडकीस आली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी कंटेनरच्या चालक व वाहकावर गुन्हा दाखल केला आहे.
साबीर युनुस खान (३४), सलीम गफार खान (३२, दोघे रा. कोट, जि. पलवन, हरयाणा) अशी आरोपींची नावे आहेत. भिंवडी (मुंबई) येथून ॲमेझॉन कंपनीचे साहित्य घेऊन कंटेनर (एचआर ३८ एसी ४८२५) अर्जव इंडस्ट्रियल वेअर हाऊस पार्क धानकुनी, पश्चिम बंगाल जाण्यासाठी निघाला. यात ४८ लाख ५५ हजार ९७७ रुपयांचे विविध साहित्य होते. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना तालुक्यातील मानेगावजवळील एका पेट्रोल पंपावर कंटेनर सोडून दिला. चालक व वाहकाने कंटेनरच्या मागील बाजूचे सील व कुलूप तोडून इलेक्ट्राॅनिक, ब्युटी पार्लर, खेळणे तसेच इतर घरगुती असे हजार ९४१ वस्तू किमत २३ लाख १९ हजार ८३३ रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.
कंटेनरमधून साहित्य चोरीस गेल्याच्या या प्रकाराची माहिती कंटेनर मालक मनोज विजय त्यागी (रा. फरिदाबाद, हरयाणा) यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी शनिवारी लाखनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून दोघांवर भादंवि ३८१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार शालू भालेराव तपास करीत आहेत.