मोहाडी (भंडारा) : एरव्ही शांत, नो क्राईम म्हणून ओळख असलेल्या मोहाडी शहरात पोलिसांची गांधीगिरी व मवाळ भूमिकेमुळे तसेच प्रचलित कायद्याचा धाक नसल्याने व लगेच जामीन मिळत असल्याने सध्या गुंडगिरीने डोके वर काढले आहे. धाक, दपटशाही, दहशत कायम करण्यासाठी मारहाण, दरोडा, जबरी हप्ता वसुलीसारखे अनेक प्रकार सुरू झाले आहेत. येथील जनता स्वतःला असुरक्षित समजत असून, दहशतीखाली आलेली आहे.
येथील आंधळगाव मार्गावर खरेदी - विक्री संस्थेच्या परिसरात राहणारी एक व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून, त्याला पोलिसांचे अभय असल्याने तो अनेक दिवसांपासून येथे गांजा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने येथीलच एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास १५ ते २० लोकांचा जमाव त्या गुंडाच्या घरावर चालून गेला होता. मात्र, लोकांचा जमाव बघून तो आपल्या भावासोबत घरून पळून गेला.
जमावाने शहरभर त्याचा शोध घेतला. पण, तो सापडला नाही. याची तक्रारही मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. यापूर्वी १५ ते २० दिवसांपूर्वी त्या भागात व्यवसाय करणाऱ्या चार, पाच दुकानदारांकडून त्याने धाक दपटशा करून जबरी हप्ता वसुली केल्याची चर्चा आहे. मात्र, त्याच्या धाकाने व पोलीस काही करीत नाहीत. यामुळे कोणीही पोलिसात तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
मोहाडी शहरात काही वर्षांपूर्वी अशाच एका गावगुंडाने दहशत निर्माण केली होती. त्याचा सोक्षमोक्ष नागरिकांनीच लावला होता. पोलिसांनी या गुंडाचा बंदोबस्त केला नाही तर असाच काहीसा प्रकार या गुंडाच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी त्याला शोधण्यासाठी गेलेल्या जमावाला तो गुंड सापडला असता तर नक्कीच अप्रिय अशी मोठी घटना घडायला वेळ लागला नसता. मात्र, अशा प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी दादागिरी करणाऱ्या अशा तत्त्वांचा वेळीच बंदोबस्त करावा, जेणेकरून जनतेला कायदा आपल्या हातात घेण्याची वेळ येणार नाही, अशी मागणी सुज्ञ व शांतताप्रिय अनेक नागरिकांनी केली आहे.