लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध समस्या विभागीय आयुक्तांच्या दरबारात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मांडल्या. यावेळी प्रकल्पग्रस्तांचा वीज पुरवठा खंडित करू नका, असे निर्देश देण्यात आले. गोसे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू होते. बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. यावेळी राज्यमंत्री कडू यांनी ग्रामपंचायती अंतर्गत वाढीव कुटुंबांची नोंदणी झालेल्या २१ हजार २२८ कुटुंबांना मदत देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. रोजगारासाठी माहिती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले तर गोसे बाधित ८५ पुनर्वसित गावे तक्रारमुक्त करा, असे निर्देश देत याबाबत तत्काळ अहवाल देण्याचे सांगण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकल्पग्रस्तांचा वीज पुरवठा खंडित करू नका, असे निर्देश वीज वितरण कंपनीला दिले आहे. सभेला बाळकृष्ण जुआर, यशवंत टिचकुले, भाऊ कातोरे, मंगेश वंजारी, विष्णू पडोळे, विनोद वंजारी, मारोती हारगुडे, गणेश आग्रे, एजाज अली नबी अली यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सुटाव्या, अशी विनंती यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी आयुक्तांकडे केली.