गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र : शेतकरी जनआंदोलन समितीचे गठनपवनी : विदर्भातील सर्वात मोठे राष्ट्रीय गोसेखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आला आहे. या धरणाचे पाणी उजवा व डावा कालव्याद्वारे व उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीला देवून सिंचन करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. पण अजुनही मोठ्या प्रमाणावर शेती वंचित आहे. त्यामुळे पुर्व विदर्भातील सिंचनापासून वंचित असलेल्या शेतीला सिंचन, करण्याकरिता, मासेमारी व्यवसाय काढावा याकरीता धरणाचे पाणी तलावात सोडावे, धरणाची शिल्लक असलेली कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे याकरीता जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र शेतकरी जनआंदोलन समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत समितीचे संयोजक मोहन पंचभाई यांनी दिली.पत्रकार परिषदेत माहिती देताना मोहन पंचभाई यांनी सांगीतले की, मागच्या व यावर्षी सुद्धा अवर्षणाची स्थिती असताना, गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या सिंचनामुळे येथील शेतीला फार मोठा फायदा झाला आहे. डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता खंडाते यांच्याकडे अनेकदा केलेली मागणी त्यांनी मान्य करून कालव्यात वेळोवेळी सिंचना करीता पाणी सोडले. त्यामुळे चौरास सह अनेक गावातील शेतीला मोठ्या प्रमाणात सोेय झाली.गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प असताना त्याचे काम फार संथ गतीने सुरु आहे. याकडे शासनाचा बघण्याचा दृष्टीकोन उदासीनतेचा आहे. प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्या अनेक समस्या आहेत. उपकालवे, पाटचारी यांचे कामे सुद्धा रखडले आहेत. अपुऱ्या निधीत ही कामे केव्हा पुर्ण होणार व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाणी केव्हा मिळणार यात शंका निर्माण झाली आहे. या करीता प्रसंगानुरुप जनआंदोलन उभारणे काळाची गरज आज निर्माण झाली आहे.गोसेखुर्द धरणाच्या डाव्या तिरावर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु असून याद्वारे २४ मेगावॅटची विद्युत निर्मिती होणार आहे. त्यामुळे पवनी तालुक्यातील विजेची समस्या सुटणार आहे. तालुक्यात निर्माण होणारी विद्युत तालुक्यातच उपयोगात आणावी तसेच ढिवर समाजाचे मासेमारी करीता तलावातील पाणी आटल्यामुळे फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. या तलावात गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडावे व नेरला उपसा सिंचन व मोखाबर्डी उपसा सिंचन योजना पुर्णत्वास आल्यामुळे त्याद्वारे पाणी शेतीला द्यावे. आदी मागण्या संघर्ष समिती तर्फे करण्यात आल्या आहेत. (शहर/तालुका प्रतिनिधी)
गोसेखुर्द धरणामुळे मिळाली नवसंजीवनी
By admin | Published: September 15, 2015 12:42 AM