भंडारा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना शेतमालाला भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती. मात्र, शेतमालाच्या किमती मागील वर्षीप्रमाणेच स्थिर असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. पूर्व विदर्भात धान, ऊस, सोयाबीन, कापसाचे पीक घेतले जाते. यातच मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि आता कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याचाच परिणाम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी बाकावर बसून धानाला, भाव मागणारे सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कसे विसरले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.धानाचे उत्पादन खर्च साधारणत: १० ते १२ हजारांपर्यंत आहेत. यातच महागडे बियाणे आणि किटकनाशकांमुळे धानाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या या हमी भावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरु न निघणे कठिण झाले आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ पडल्याने उत्पादनाची टक्केवारी कमालीची घसरली आहे. मजुरांचा वाढता खर्च आणि शेती साहित्याचा विचार केल्यास आता शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना हातउसणवारी करून कुटुंब चालवावे लागत आहे. काही ठिकाणी मुलींचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडेनासा झाला आहे. राज्य शासनाने परीक्षा शुल्क माफ केले असले तरी, पोटाला लागणारे अन्न आणि मुलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न कायमच आहे. (शहर प्रतिनिधी)
शासन बदलले; शेतमालाचे भाव तेच
By admin | Published: December 30, 2014 11:28 PM