लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मुंबई येथील सरपंच संघटनेच्या आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेतली. नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी राज्यातील सरपंच व उपसरपंचांना लोकसंख्येच्या प्रमाणात अतिशय कमी मानधन दिले जात होते. दिवाळीच्या तोंडावर सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. परंतु, झालेली वाढ अतिशय तोकडी असल्याची नाराजी सरपंच, उपसरपंचांकडून व्यक्त होत आहे. निर्णयाचा फेर विचार करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयाचे सरपंच व उपसरपंचाकडून स्वागतही होत आहे.
जबाबदारीच्या तुलनेत अत्यल्प मानधन सरपंच व उपसरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाला शोभेल एवढे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र अत्यंत कमी मानधन मंजूर करण्यात आले. ही एक प्रकारची थट्टाच आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. सरपंचांच्या सन्मानाला ठेच पोहोचविली जाऊ नये, अशी अपेक्षा आहे.
सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पटसरपंचांना १० हजारांपर्यंतआठ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरपंचाला मासिक १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पूर्वी पाच हजार मानधन होते. निर्णयानुसार मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
उपसरपंचांना चार हजारांपर्यंतगावाचे प्रथम नागरिक असलेल्या सरपंचाच्या तुलनेत उपसरपंचाला अर्धे मानधन दिले जाणार आहे. ८ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर उपसरपंचास चार हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे.
वाढीव मानधनलोकसंख्या मानधन ० ते २००० : ६००० (सरपंच) २००० (उपसरपंच)२००० ते ८००० : ८००० (सरपंच) ३००० (उपसरपंच)८००० हून जास्त : १०,००० (सरपंच) ४००० (उपसरपंच)
"सरपंचपद प्रतिष्ठेचे व सन्मान वाढविणारे आहे. पूर्वी या पदाला साजेशे मानधन राज्य शासनाने देणे अपेक्षित होते. आता सरपंच संघटनेच्या मागणीला शासनाने प्रतिसाद देत मानधनात दुप्पट वाढ केली आहे. यावर आमचे समाधान आहे."- शिल्पा तुमसरे, सरपंच, पालोरा.
"दोन हजारापर्यंत लोकसंख्या असलेले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाला केवळ एक हजार रुपये मानधन होते. आता दोन हजार दिले जाणार आहेत. सरपंचांना किमान १५ हजार रुपये तर उपसरपंचास १० हजार रुपये सरसकट मिळायला पाहिजे होते." - गौरीशंकर राऊत, उपसरपंच, पांजरा