युवराज गोमासे
करडी (पालोरा): करडी परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र कामधंदे ठप्प आहेत. अशातच मोलमजुरी करणान्या मजुरांची स्थिती भयावह आहे. त्यातच आता आणखी काही दिवसांसाठी 'ब्रेक द चेन' या लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.
मजुरांच्या पोटाच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन
प्रयत्नरत आहे. तसेच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत
आहे, परंतु यांच्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे. यात
लघु व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण झाली आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे.
अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने ब्रेक द चेनमुळे ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. नागरिकांना
जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काही वेळ मर्यादित करून
देण्यात आली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजूर वर्गाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढविल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे. मजूर वर्गासाठी सरकारने पावले उचलून मदतीच्या हात देण्याची मागणी होत आहे.
एकीकडे शासन गरीब मजुरांना अल्पदरात धान्य वाटप
करण्याच्या तसेच मोफत जेवण देण्याच्या वल्गना करीत आहे. ही केवळ आश्वासनेच असून प्रत्यक्ष मजुरांच्या झोळीत काहीच पडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. संचारबंदी लागू करण्यापूर्वी सर्वसामान्य व गरीब लोकांचा प्राधान्याने विचार करणार, रोजीरोटी कायम ठेवण्यात येईल असे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र मजुरांना अजूनही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न कायम आहे.
बॉक्स
वाढत्या उष्णतेने जनावरांचे आरोग्य धोक्यात
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळलेली तुरळक संख्येत जनावरे औषधोपचारासाठी
आणण्यात येते. वाढत्या तापमानात आता जनावरांचीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरापासून उन्हाच्या झळा तीव्र होण्यास
सुरूवात झाली आहे. एप्रिल अखेरच्या पंधरवड्यात तर तापमान ४२ ते ४५ अंशाच्या घरात वाढते. मध्यंतरी
वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. मनुष्याप्रमाणेच प्राण्यांच्याही प्रकृतीत बिघाड येतो आहे. उष्णतामान वाढून जनावरांनाही ताप येतो. जनावरे तसेच पक्षीदेखील उन्हाच्या तडाख्यात आजारी होतात. या बाबी अपवादात्मक दिसत असल्या तरी पशुपक्ष्यांचीही काळजी घेण्याची गरज आहे. जनावरे, पक्ष्यांना पाणी तसेच खाद्य न मिळाल्यास त्यानाही उष्माघाताच्या आजाराला समोरे जावे लागत आहे.