शासकीय धान गोदामातील मजुरांना २१ जून, २०१८ आणि १३ ऑगस्ट, २०१८च्या माथाडी बोर्डाच्या आदेशानुसार, १ एप्रिल, २०१८ पासून ३१ मार्च, २०२१ पर्यंत वाढीव रेट निर्धारित करण्यात आले होते. याबाबत विदर्भ जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वात मजुरांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तसेच वाढीव मजुरीचे आदेश काढण्यात आले नाही. त्यामुळे मजुरांऐवजी ठेकेदारांचाच फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लॉकडाऊन कालावधीत या मजुरांकडून कामे करवून घेण्यात आली. याच कारणामुळे मनोहर केदवतकर या मजुराचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वच हमालांना आरोग्यसेवा आणि विम्याची सुविधा लागू करावी व एरियस देण्यात यावे, अशी कामगारांची मागणी आहे. अनेकदा मागणी करूनही मजुरांच्या मागण्यांवर कोणताही विचार करण्यात न आल्याने विदर्भ जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वात मजुरांनी संप पुकारला आहे.