लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सात महिन्यांनंतर अर्थव्यवस्था रूळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊन नकोच असा सूर व्यापारी, उद्योजक, कामगारांचा आहे. प्रचंड आर्थिक नुकसान सोसल्यामुळे पुन्हा ती स्थिती बघण्याची हिंमत नाही. परिणामी प्रशासनाने नियम कडक करावेत, पण लॉकडाऊन करू नये, अशी सर्वसामान्य बाब समोर येत आहे.दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म्हणताच मध्यमवर्गीयांच्याही तोंडचे पाणी पळते. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना फोफावत असल्याने अधिकच जोर वाढल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची पाळी येणार असे संकेत दिले जात आहेत. पहिल्या लॉकडाऊनने आर्थिक बजेट कोलमडले. दिवाळीमुळे बाजारपेठेत उलाढाल वाढली होती. अशा स्थितीत लॉकडाऊन नकोच अशी भूमिका व्यापारी, नागरिकांची सर्वसामान्यपणे दिसून येत आहे. नियम कडक करा, पण, पुन्हा लाॅकडाऊन नकोच, अशीच बाब चर्चेवरून निदर्शनास दिसून येत आहे. गत सात महिन्यात झालेल्या नुकसानीवरुन नागरिकांसह व्यापाऱ्यांनी बोध घेतल्याचे दिसून येते.
लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतात पण नागरिक घराबाहेर पडतातच. भाजी बाजारात चांगली गर्दी असते. नियमांचे पालन होत नाही. सॅनिटाइज तर सोडा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन योग्य प्रकारे होत नाही. यावर लक्ष देणे आवश्यक आहे. - नितीन दुरगकर, व्यापारी
पुन्हा लॉकडाऊन करण्यापेक्षा कामाची वेळ ठरवून द्यावी. रात्रीचा कर्फ्यू करून त्याचे कठोरतेने पालन करावे. गर्दी असणाऱ्या जागांवर लक्ष देऊन नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे व सॅनिटायजेशनबाबत जागृती करावी.- वैभव अवघाते, उद्योजक
राज्य शासनाने कोरोना संकटावर दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करणे, स्वत:सह परिसर सॅनिटाइज करणे गरजेचे आहे. याशिवाय आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचना पाळणे आवश्यक आहे. -संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा
सर्वात आधी लॉकडाऊनचा परिणाम सर्वांवर झाला आहे. अशात दुसऱ्या लॉकडाऊनची गरज पडल्यास शासनाने संपूर्ण श्रमिकांच्या व्यवस्थेची गॅरंटी कोण देणार. कामगारांना आर्थिक मदत देत मोफत अन्नधान्य देणे गरजेचे झाले आहे. - श्रीकांत पंचबुद्धे, कामगार संघटना
मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक करावे. लॉकडाऊन करणे यावर उपाय नाही. सध्या कोरोना रूग्ण वाढत आहे. लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. नियम कडक करावे पण त्याला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. - संजय निंबार्ते, मेडीकल असोसिएशन