संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या महापुराचा फटका येथील शासकीय गोदामातील धान्याला बसला असून तब्बल सहा हजार २६३ क्विंटल धान्य या महापुरात नष्ट झाले. आता या धान्याला प्रचंड दुर्गंधी पसरली असून जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने धान्य वाळू घालण्याची कसरत केली जात आहे. मात्र हे धान्य जनावरांच्या खाण्यासही उपयोगी येणार नाही अशी अवस्था महापुराने झाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात पुरवठा विभागाचे तीन धान्य गोदाम आहेत. वैनगंगेच्या पुराचे पाणी दोन गोदामात शिरले. एक गोदाम उंचावर असल्याने त्यात पाणी शिरले नाही. या दोन गोदामात पाच ते सहा फुट पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात धान्य ओले झाले. गोदामात १७ हजार क्विंटल धान्य साठवून ठेवले होते. त्यात तांदूळ ९ हजार ४७२ क्विंटल, गहू ६ हजार २१५ क्विंटल, तूर डाळ ७०० क्विंटल, चना डाळ ५४५ क्विंटल, चना ६.३२ क्विंटल आणि साखर १४४ क्विंटल साठवून होती. २९ ते ३१ ऑगस्ट या काळात पूर परिस्थिती निर्माण झाली. वैनगंगेच्या पुराचे पाणी गोदामात भरले. पाच ते सहा फुट पर्यंत पाणी या गोदामात होते. त्यामुळे धान्य पोत्यांच्या थप्प्या पाच ते सहा फुटापर्यंत ओल्या झाल्या. त्यात तांदूळ तीन हजार ८२६ क्विंटल, गहू १८३३ क्विंटल, तूर डाळ २६६ क्विंटल, चना डाळ १८८ क्विंटल, चना ६.३२ क्विंटल आणि साखर १४४ क्विंटल असे ६ हजार २६३ क्विंटल धान्य ओले झाले.आता ओले झालेले धान्य वाळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चांगले असलेले धान्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र ओले झालेल्या धान्याला आता प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. उग्र वासाने तेथे क्षणभरही माणूस थांबू शकत नाही. अशा जीकरीच्या परिस्थितीत हमाल आपला जीव धोक्यात घालून तेथे सफाई करतानाचे दृष्य दिसत होते. या परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय, पाणी पुरवठा विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आगार कार्यालय आणि ग्रामसेवक कॉलनी आहे. दुर्गंधीने या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. आता प्रशासनाच्या वतीने या धान्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. परंतु त्यासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना आवश्यक झाली आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी तहसीलदारांना या संदर्भात सूचना दिली आहे. पुराच्या पाण्यामुळे ओल्या झालेल्या थप्प्या बाहेर काढून त्यातील ओले धान्य व चांगले धान्य वेगळे करावे. खराब झालेल्या धान्याबाबत शासन निर्णय २८ ऑक्टोबर १९९९ अन्वये विल्हेवाटीचा प्रस्ताव साद करण्याची सूचना केली. महापुरातून बचावलेले धान्य वितरीत करण्यात येत असून ओले झालेले धान्य वाळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद पडोळे यांनी दिली.गोदामातील संपूर्ण साखर पाण्यात विरघळलीजिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात १४४ क्विंटल साखरेचा साठा होता. मात्र महापुराने संपूर्ण साखर पाण्यात विरघळली. एक किलोही साखर यातून बचावली नाही. अशीच अवस्था चन्याचीही झाली आहे. ६.३२ क्विंटल चणा पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे.ओले झालेले धान्य नमुने शासन नियमाप्रमाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. शासनस्तरावर विल्हेवाट करण्यासंदर्भात ज्या सूचना मिळतील त्याचे पालन केले जाईल.-अनिल बन्सोड,जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.पूरग्रस्त धान्याच्या प्रतीक्षेतएकीकडे पुराने शासकीय गोदामातील धान्य नष्ट झाले, तर दुसरीकडे भंडारा शहरात वैनगंगेच्या तिरावर राहणाऱ्या १०० झोपड्यांतील पूरग्रस्त धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे सर्वस्व महापुरात वाहून गेले. घरातील धान्यही वाहून गेले. मात्र अद्यापपर्यंत या कुटुंबांना शासनाकडून कोणतेही धान्य मिळाले नाही. सामाजिक संस्थांकडूनही कुणी पुढाकार घेतला नाही. झोपडीत राहणारे अनेक चिमुकले आणि वयोवृद्धांची तडफड होत आहे. मात्र कोरोना संकटामुळे माणुसकीचा हात द्यायला कुणी आले नाही. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन वैनगंगा नदीकाठावरील या १०० झोपड्यात राहणाºया नागरिकांना मदत द्यावी अशी आर्त हाक या भागात राहणाºया गोरगरीब कुटुंबांनी केली आहे.
शासकीय गोदामातील धान्याला प्रचंड दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 5:00 AM
ओले झालेल्या धान्याला आता प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. उग्र वासाने तेथे क्षणभरही माणूस थांबू शकत नाही. अशा जीकरीच्या परिस्थितीत हमाल आपला जीव धोक्यात घालून तेथे सफाई करतानाचे दृष्य दिसत होते. या परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय, पाणी पुरवठा विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आगार कार्यालय आणि ग्रामसेवक कॉलनी आहे. दुर्गंधीने या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
ठळक मुद्देमहापुराचा फटका : तीन दिवस गोदामात होते पाच ते सहा फूट पाणी, सहा हजार क्विंटल धान्य नष्ट, शासनाकडे अहवाल पाठविला