जून महिन्यात मिळणार होता लाभ
भंडारा : कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे गरिबांची उपासमार होऊ नये, म्हणून राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना सवलतीत धान्य देण्याचे फर्मान जारी केले. मात्र याची अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही ग्रामीण भागात शिधापत्रिका धारकांना धान्य मिळाले नसल्याचे समजते.
जिल्ह्यात ८५० पेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकाने आहेत. विशेष म्हणजे जून महिन्यात केशरी कार्डधारकांनाही सवलतीत धान्य दिले जाणार आहे. याची सुरुवात अनेक ठिकाणी झाली, मात्र ग्रामीण क्षेत्र पिछाडीवर असल्याचे समजते. यात २६ हजार केशरी कार्डधारकांना सवलतीचा लाभ मिळणार होता. यासह अन्य गटातील लाभार्थ्यांना धान्य देण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना हा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख ५७ हजार ५१२ धारक आहेत. त्यात बीपीएल कार्डधारकांची संख्या ६५ हजार ३९० इतकी आहे. तसेच अंत्योदय योजनेचे एक लाख ६५ हजार ६२८ रेशनकार्डधारक आहेत. मात्र योजनेअंतर्गत अजूनही ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थी धान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
बॉक्स
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गरीब व गरजू लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन देण्यात येत असते. यात पॉस मशीनवर धान्य व त्यानंतरच अंगठा लावा, असे निर्देश अन्न व पुरवठा विभागाचे आहेत. मात्र काही ठिकाणी मे महिन्यातच अंगठा मशीनवर लावून घेण्यात आला होता. मात्र जून महिना अर्धा लोटूनही अजूनपर्यंत लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही. यासंदर्भात ग्रामीण क्षेत्रातून तक्रारी येत असून यासंदर्भात जिल्हा पुरवठा व तालुका अन्न पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा सरकारकडून मिळालेले धान्य काळ्याबाजारात विकण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कार्डाचे प्रमाणीकरण व त्याची तपासणी काटेकोरपणे करण्याची मागणीही जनमानसातून होत आहे.
बॉक्स
कुटुंबाचा गाडा ओढायचा कसा?
राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे रेशन मिळायचे होते. मात्र वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही अजूनपर्यंत आम्हाला धान्य मिळाले नाही. यासंदर्भात स्वस्त धान्य दुकानदाराकडे पाठपुरावा केला आहे. मात्र धान्य आले नसल्याचे सांगण्यात आले. धान्य देण्याची मागणी आहे
- प्रेमदास राखुंडे, साकोली.
कोरोना महामारीमुळे आम्ही त्रस्त आहोत. त्यात एका योजनेअंतर्गत दीड हजार रुपयांची मदतही आम्हाला मिळाली. मात्र स्वस्त धान्य अजूनपर्यंत मिळाले नाही. मागील महिन्यात तांदूळ आणि गहू मिळाले होते. मात्र जून महिन्याचे रेशन अजूनपर्यंत मिळाले नाही. वेळीच धान्य मिळावे.
- कोमल लांजेवार, लाखनी
रेशन कार्डवर सवलतीत धान्य मिळणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यासंबंधाने स्वस्त धान्य दुकानात आम्ही जाऊन आलो. परंतु धान्य यायचे आहे, असे सांगण्यात आले. मे महिन्यात पॉस मशीनवर अंगठा लावून धान्य उचल केली होती. या महिन्यात काय झाले हे ठावूक नाही.
- अजय लाडे, लाखांदूर.