लाखांदूर : शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात रोहयोची ६६८ कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र तालुक्यात कोरोना विषाणू आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संभाव्य संसर्ग प्रतिबंधासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी रोहयो कामांना ब्रेक लावल्याची माहिती आहे.
लाखांदूर तालुक्यात एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत गत काही दिवसांत मागणीच्या आधारावर शासनाने तालुक्यात रोहयोची ६६८ कामे मंजूर केली आहेत. या कामात नाला सरळीकरण, भातखाचरे व जनावरांचे गोठे बांधकाम आदींचा समावेश आहे. या मंजुरीअंतर्गत तालुक्यातील अनेक गावांत अकुशल कामे उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामपंचायतीसह पंचायत समिती स्तरावर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. या कामांना सुरुवातदेखील केली जाणार होती. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कामावर होणारी मजुरांची गर्दी टाळण्यासाठी तुर्तास तालुक्यातील सर्वच रोहयो कामांना ब्रेक लावण्यात आला आहे.
दरम्यान, गतवर्षीदेखील कोरोना पार्श्वभूमीवर रोहयोची कामे बंद ठेवण्यात आल्याने संपूर्ण उन्हाळी हंगाम मजुरांनी घरीच बसून काढल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागल्याची ओरड होती. यावर्षीदेखील ऐन उन्हाळ्यातच कोरोनाने तोंड वर काढल्याने पुन्हा एकदा मजुरीविना मजुरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
आता पुढील वर्षातच कामांची शक्यता
शासनाने या आजाराच्या प्रतिबंधासाठी ‘ब्रेक द चेन’ची घोषणा केली. तसेच संचारबंदीही लागू केली. तालुक्यात सर्वत्र बंद पाळले जात आहे.
मात्र या परिस्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण येत्या काही दिवसात कमी न झाल्यास कदाचित रोहयोच्या कामांना कायम ब्रेक लागून पुढील वर्षातच कामे सुरू केली जाणार असल्याची चर्चा आहे.