राजू बांते
मोहाडी : गाव तेथे गट अन् तट. विविध पक्षांसोबत बांधिलकी असणारे नेते. यांचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पत व सन्मानासाठी चांगलाच कस लागणार आहे.
राजकीय नेत्यांनी आपले वजन वाढावे यासाठी प्रत्येक गावात कार्यकर्ते निर्माण केले आहेत. काही नेत्यांनी तर एका गटाचे दुसऱ्यांशी भांडण लावून आपले राजकारण चालवले आहे. त्यामुळे गावागावात एकीच्या बळाला खिंडार पडली आहे. गट, तट, पक्ष यामुळे मतभेद वाढून गावातील एकतेची मोठी दरी निर्माण झाली आहे. याच कारणामुळे गावात पक्ष, गट, जात या समीकरणावर गावपातळीवर निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. कोण उमेदवार कोणाच्या गटाचा, कोणत्या पक्षाचा समर्थित आहे, याची जाणीव गाव मतदारांना असतेच. कोणता पुढारी पॅनल लढवीत आहे, याचाही अभ्यास मतदारांना झालेला आहे. गावात विविध राजकीय पक्षांचे नेते, गटाचे कार्यकर्ते तालुका, जिल्हा पातळीवरच्या सत्तास्थानी आहेत. आपण उभी केलेले पॅनल निवडून आले पाहिजे, यासाठी जिकरीचे गाव नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाला तर त्यांची वरिष्ठ नेत्यांजवळ मानहानी होणार आहे. गावा सांभाळता आले नाही तर मोठ्या नेत्यांना त्यांची लायकी किती हे दिसून येणार आहे. गावातील पत, सन्मान व प्रतिष्ठा वाचविण्यासाठी गाव नेत्यांची चांगलीच धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गावनेत्यांना सन्मानाची लढाई जिंकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिक धडकी भरली आहे.