देवानंद नंदेश्वर
भंडारा : जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. प्रत्येक मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे गावोगावी प्रचाराचा धुरळा उडत आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी असली तरी, सोशल मीडियावरील प्रचाराला निर्बंध कोणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आचारसंहितेस न जुमानता सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता लागू होते. ग्रामपंचायत निवडणुकीत तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. तालुकापातळीवर स्वतंत्र आचारसंहिता कक्षही स्थापन आहे. मात्र तरीही नियमांना न जुमानता सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे प्रचार रंगला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी चुरशीची निवडणूक होत आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असल्याने तिला चांगलाच रंग भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारतोफा शुक्रवारी थंडावणार असल्या तरी आता प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जाणार आहे.
एजन्सी मालामाल, नियमांना मात्र हरताळ!
उमेदवारांना सोशल मीडियावरील पोस्ट तयार करून देण्यासाठी अनेकजणांनी व्यवसाय सुरू केला आहे. या एजन्सीनी गावातील पॅनेलच्या प्रचाराचे काम हाती घेत स्टेटससाठी पोस्ट तयार करून देणे. त्या व्हायरल करणे. ही कामे सुरू केली आहेत. परिणामी: आदर्श आचारसंहितेला मात्र अशा कृत्याने हरताळ फासला गेला आहे.
होऊन जाऊ दे खर्च, विचारतो कोण?
सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी खास टीम नेमण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. खर्चाचे हिशोब तहसील कार्यालयात जमा करावयाचे आहेत. त्याच वेळी सोशल मीडियावर पेड जाहिराती केल्या तरीही त्याचा हिशोबच विचारला जात नसल्याने अनेक जणांनी याचा गैरफायदा घेण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.
आक्रमक प्रचार वाद निर्माण करतील
सोशल मीडियावर विशेषतः स्टेटसच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार आक्रमकपणे सुरू आहे. विरोधी उमेदवारावर थेट आरोप करीत प्रचार सुरू आहे. त्यामुळे यातून सध्या तरी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले आहेत. याचे गंभीर परिणाम होणार नाहीत, यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.