राजू बांते
मोहाडी (भंडारा) : घरात सासू अन् सुनेत खटके, वर्चस्वाची लढाई नेहमी बघायला मिळते. आता तर ग्रामपंचायतच्या प्रमुख कारभारी बनण्यासाठी महालगाव-मोरगाव येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नातेवाईक असणाऱ्या पुतणीने जावांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आता या ग्रामपंचायतीमध्ये दोन जावांच्या अन् पुतणीची लढत बघायला मिळणार आहे.
महालगाव-मोरगाव या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नात्यातील तीन महिला उमेदवारांची झुंज बघण्यास मतदार उत्सुक झाले आहेत. गावगाड्याच्या राजकारणात अनेक समीकरणे बदलत असतात. अगदी अखेरच्या दिवसापर्यंत काय होईल, हे सांगता येत नाही, पण मोहाडी तालुक्यातील महालगाव-मोरगाव येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन सख्ख्या जावा अन् पुतणी आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. मतदार ‘जाऊ बाई जोरात...’चा अनुभव घेत आहेत.
एकाच कुटुंबात सरपंच पदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्ष समर्थित एक जाऊ, तर दुसरी जाऊ स्वतंत्र उभी आहे. तसेच या दोन जावांच्या विरोधात बीआरएसकडून पुतणी उमेदवार आहे. महालगाव-मोरगाव मिळून एक ग्रामपंचायत आहे, पण महालगावात तीनही महिला सरपंच पदाच्या दावेदार आहेत. त्यांचा प्रचार जोमात सुरू आहे.
प्रतिस्पर्धी महिला उमेदवार नात्यातील असल्याने कोणाला मत द्यायचे. त्यांचे नातेवाईक व मतदार पेचात सापडले आहेत. तिघींचे गावात दांडगे प्रस्थ असल्याने गावकरी कोणाला मत द्यायचे म्हणून बुचकळ्यात पडले आहेत. उइके कुटुंबातील लोकंही कोणाला मत द्यायचे याबाबत विचारात पडले आहेत. गुप्त मतदान असल्याने नातेवाइकांनी नक्कीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नातेवाइकांनी कोणाच्याही प्रचारात भाग न घेता सावध पवित्रा घेतला आहे. तिघींना विजयाची आशा आहे. त्यामुळे कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. गावाचे राजकारण तापले आहे. त्यामुळे दोघींच्या लढतीत तिसऱ्याचा लाभ अशीही शक्यता आहे.
रोहणा येथेही जावा आमने-सामने
रोहणा येथेसुद्धा सरपंच पदासाठी दोन जावांमध्ये लढत होणार आहे. तसेच एका वॉर्डात सासू अन् सून ग्रामपंचायत सदस्यासाठी एकमेकांना टक्कर देणार आहेत.