लोकमत न्यूज नेटवर्कखापा : तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातील सदस्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. नियमानुसार, निवडून आल्यावर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र, मुदत संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाही 'त्यां सदस्यांकडून अद्याप प्रमाणपत्र आलेले नाही. त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार राहू शकते.
सन २०२२ मध्ये तुमसर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ७८ निवडणुका पार पडल्या. राखीव प्रवर्गातून निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लवकरात लवकर जात वैधता सादर करण्याबाबतचे आदेश तुमसर तहसीलदार यांनी सर्व सचिवांमार्फत संबंधित सदस्यांना पंधरा दिवसांअगोदर दिले आहेत.
राखीव प्रवर्गातून नामनिर्देशनपत्र भरून निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक असते, अन्यथा अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तुमसर तालुक्यात २०२१ मध्ये १८ ग्रामपंचायत तसेच २०२२ मध्ये ७८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. यात राखीव प्रवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. प्रशासनाकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या कालावधी संपला आहे.
आवाहनानंतरही जात वैधता प्रमाणपत्र नाही२०२२ मध्ये झालेल्या ७८ ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये २६२ उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यापैकी २३४ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागात जमा केलेल्या असून, २८ उमेदवार शिल्लक आहेत. तसेच २०२१ मध्ये झालेल्या १८ ग्रामपंचायतींमधून ५ उमेदवारांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने हे सदस्य भविष्यात अडचणीत येऊ शकतात. यातील काही सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती आहे.