हरदोलीतील घटना : आंधळगाव पोलिसांचा प्रतापतुमसर : झुडपी जंगल जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण काढणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची घटना तालुक्यातील हरदोली येथे घडली. तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आंधळगाव पोलीस हद्दीतील हरदोली येथे गट क्रं २५२ - २५३ मध्ये झुडपी जंगल आहे. त्या जमिनीवर तीन चार वर्षापासून अनधिकृत अतिक्रमण असून शेती केली जाते. ही जागा गाव विस्ताराकरिता मिळावी याकरिता ग्रामसभेत ठराव घेवून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु कारवाई झाली नाही. २६ जानेवारीला ग्रामसभेत एकमताने ठराव पारीत झाला. गाव हिताचे दृष्टीकोन समोर ठेवून ग्रामसभेने तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे ठरविले. त्यानुसार ग्रा.पं. चे सर्व पदाधिकारी पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्षासह गावातील नागरिकांनी अतिक्रमण काढले. दरम्यान अनधिकृत अतिक्रमण धारकाने आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताच पोलिसांनी सरपंच कलावंता पटले, उपसरपंच नरेंद्र मडावी, पोलीस पाटील जगन्नाथ कटरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शालिक पटले यांच्यासह २८ लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)
अतिक्रमण काढणाऱ्या ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
By admin | Published: January 31, 2016 12:35 AM