उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना दिलासा
दिघोरी(मोठी) : येथील वाॅर्ड क्रमांक दोनमधून शेतावर जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर सिद्धार्थ राजहंस लोणारे यांनी अतिक्रमण केल्यामुळे शेतावर ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यानुसार येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत दिघोरीला वारंवार सूचना व लेखी अर्ज दिले. परंतु, याचा काहीही उपयोग न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोरच तंबू उभारून हे अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण सुरू केले.
शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात करताच ग्रामपंचायत प्रशासन खळबळून जागे झाले व उपोषणकर्त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार लाखांदूरचे नायब तहसीलदार एन. टी. पाथोडे, दिघोरीचे ठाणेदार हेमंत पवार, सरपंच अरुण गभने, ग्रामविकास अधिकारी अनिल धमगये, तंटामुक्त अध्यक्ष महादेव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक चिमनकार, पद्माकर चेटुले, संदीप पुरामे आणि सिद्धार्थ लोणारे यांच्यात दिघोरी ग्रामपंचायतीत चर्चा झाली. यामध्ये सिद्धार्थ लोणारे यांनी सहकार्य न दाखविल्याने पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन अतिक्रमण काढण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणसंबंधी लोणारे यांना हटकले असता, लोणारे यांनी उलट तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपोषणकर्ता शेतकऱ्यांवर याआधी दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोणारे हे ॲट्राॅसिटीची तक्रार देण्याची धमकीसुद्धा उपोषणकर्त्यांना देत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते. शेतात जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सुनील फुलबांधे, योगेश फुलबांधे, अनिल फुलबांधे, खुशाल चिमणकर, विलास फुलबांधे, विनोद फुलबांधे, देवेंद्र फुलबांधे, चंद्रशेखर फुलबांधे, रोहित फुलबांधे उपोषणाला बसले होते. शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न प्रशासनाने तत्काळ सोडविण्याची मागणी दिघोरीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
020921\1720-img-20210902-wa0029.jpg
उपोषणाला बसलेले शेतकरी