सकोली (भंडारा) : ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मासिक सभेत ग्रामसेवकाने चक्क खुर्चीत बसून चक्क झोप काढली. या प्रकाराने मासिक सभा रद्द करण्याची वेळी आली. साकोली तालुक्यातील विर्शी येथे सोमवारी घडलेल्या प्रकाराची तालुक्यात चर्चा सुरू आहे. ग्रामासेवक मद्य प्राशन करून असल्याचा आरोप असून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विर्शी ग्रामपंचायतीची मासिक सभा सोमवारी आयोजित होती. या सभेसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले. मात्र, तिथे आल्यावर पाहतात तर ग्रामसेवक हेमंत पब्बेवार खुर्चीवर झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. सरपंच, उपसरपंचांनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मद्य प्राशन करून असल्याचे दिसून आले. शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारण्यात आले. मात्र, काही केल्या जागे होत नव्हते. त्यामुळे संतप्त सरपंच, उपसरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यावरून विस्तार अधिकारी टेंबरे यांना विर्शी येथे पाठवून चौकशी करण्यास सांगितले.
विस्तार अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात आले. मात्र, तोपर्यंत ग्रामसेवक तिथून निघून गेले होते. या प्रकारची सध्या तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे. ग्रामसेवकावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. मासिक सभेच्या वेळी घडलेला प्रकार निंदनीय असून कर्मचारी शासकीय कार्यालयात मद्य प्राशन करून येणे हा प्रकार शोभनीय नाही. ग्रामसेवकाचे तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
अहवाल वरिष्ठांना दिला
गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मी विर्शी ग्रामपंचायत कार्यालयात गेलो. त्यावेळी ग्रामसेवक तेथे नव्हते. मात्र, सरपंच, उपसरपंच व सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांना अहवाल सादर केलेला आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी के. डी. टेंबरे यांनी दिली.
माझ्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहे. मी लाखनीवरून मोटारसायकलने आलो. त्यावेळी मला उन्हाचा त्रास झाला. माझी प्रकृती बिघडली. मला चक्कर येत होती. त्यामुळे काही वेळ खुर्चीत आराम केला. मी झोपलो नव्हतो.
- हेमंत पब्बेवार, ग्रामसेवक, विर्शी