तुमसर : तालुक्यातील गोबरवाही येथे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामसेवकांकरिता सदनिकेचे बांधकाम केले होते. १९९०पर्यंत या सदनिकेत ग्रामसेवकांचे वास्तव्य होते. त्यानंतर मागील तीस वर्षांपासून ग्रामसेवक येथे वास्तव्याला नाहीत. त्यामुळे या सदनिकेची दुरवस्था झाली असून, ती कोसळण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाले असून, लाखो रुपये खर्च करुन बांधलेली इमारत दुर्लक्षामुळे भुईसपाट होत आहे.
१९६२मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात आपल्या कर्मचाऱ्यांकरिता कार्यालय, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचाऱ्यांकरिता सदनिकांचे बांधकाम केले. सुरूवातीला या सदनिकांमध्ये कर्मचारी मुख्यालयी राहात होते. परंतु, त्यानंतर शहरातून अप-डाऊन करण्याची स्पर्धा कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये लागली. गोबरवाही येथे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामसेवकांकरिता सदनिकेचे बांधकाम केले. १९९०पर्यंत या सदनिकेत ग्रामसेवकांचे वास्तव्य होते. त्यानंतर ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे सोडून शहरातून अप-डाऊन करणे सुरू केले. त्यामुळे या इमारतीकडे सध्या कोणी ढुंकूनही पाहत नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने या इमारतीची दुरुस्तीसुद्धा केली नाही. जरी कर्मचारी वास्तव्याला नसले तरी जिल्हा परिषद प्रशासनाने इमारतीची डागडुजी, दुरुस्ती करण्याची गरज होती. ही इमारत आता पडण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या मालकीच्या रिकाम्या इमारती बीओटी तत्त्वावर भाड्याने देण्यासह पडक्या इमारतींचे बांधकाम करून महसूल वाढविण्याची गरज आहे. आतापर्यंत या इमारतींचे ऑडिट झालेले नाही. जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र अधिकारी, अभियंते यांची फौज आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती ग्रामीण परिसरात बेवारस पडून आहेत. यामुळे जिल्हा परिषदेची लाखोंची संपत्ती भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे.