स्थायी समितीत उठला मुद्दा : बेला मामा तलावातील मुरूम प्रकरण, नरेश डहारे यांनी फोडले अधिकाऱ्यांवर खापर लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेला येथील मामा तलावातील मुरूमाची नियमबाह्यरीत्या विक्री केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. आज झालेल्या स्थायी समितीत हा मुद्दा कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी लावून धरला. यावेळी त्यांनी दोषी असलेल्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान बेला येथील ग्रामसेवक नागपूरे यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेला उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, बांधकाम सभापती विनायक बुरडे यांच्यासह सर्व विशेष समिती सभापती यांच्यासह सदस्य संदीप टाले, धनेंद्र तुरकर व सर्व समिती सदस्य तथा अधिकारी उपस्थित होते.१५ जूनला झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी बेला येथील मुरूम प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर आज झालेल्या स्थायी सभेच्या सुरूवातीपासूनच बेला येथील ग्रामपंचायतने मामा तलावातील गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार अंतर्गत केलेल्या कामाचे व त्यातून निघालेल्या मुरूमाची केलेली परस्पर विक्री याला सभापती नरेश डहारे यांनी हात घातला. सुरूवातीपासूनच त्यांनी आक्रमक भूमिका घेवून उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे यांना चांगलेच धारेवर धरले. सभापती डहारे यांच्या प्रश्नाला साजेसे उत्तर न मिळाल्याने त्यांनी यात दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या संबंधात ठराव घेण्याची मागणी केली. या अनुषंगाने बेला ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामसेवक नागपूरे यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले. त्यांच्या ऐवजी जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी आर.जे. बारई यांना बेला येथील मुळ पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रूजू होण्यासाठी कार्यमुक्त केले. सोबतच तलावातील केलेल्या खोदकामाची लघु सिंचाई पाटबंधारे विभागाकडून तातडीने अहवाल मागितला आहे. या अनुषंगाने या गंभीर प्रकरणात आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान पंचायत समिती उपसभापती ललीत बोंदरे यांनी बेला येथील मुरूम प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण प्रारंभ केला होता. मात्र स्थायी समितीत हा मुद्दा डहारे यांनी लावून धरल्यानंतर जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती डहारे यांच्यासह अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जाऊन बोंदरे यांचे उपोषण सोडविले. ग्रामसेवकांवरील निलंबनाच्या कारवाईला विरोधतुमसर तालुक्यातील लेंडेझरी येथील ग्रामसेवक घाटोळकर, माडगी येथील गायधने व पिपरी (चुन्नी) येथील ग्रामसेवक वैद्य यांच्यावर घरकूल रक्कम वाटपात दिरंगाई होत असल्याचा ठपका ठेऊन निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणात या तिन्ही ग्रामसेवकांचा दोष नसून सदर घरकूल एमआरईजीएस अंतर्गत बांधकाम करण्यात आले. त्यामुळे ही रक्कम संबंधित विभागाने देण्यास कुचराईपणा केला आहे व मस्टर लिहिण्याचे काम रोजगार सेवकाचे असल्याने ग्रामसेवकांचा यात दोष नाहीत. हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले यांनी स्थायी समितीत लावून धरला. एमआरईजीएसच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असाही मुद्दा टाले यांनी सभागृहात लावून धरला. यासोबतच मानधन तत्वावर घेतलेल्या शिक्षकांचे मागिल काही महिन्यांचे थकित मानधन त्वरीत देण्याची मागणीही संदीप टाले यांनी लावून धरली.
ग्रामसेवक नागपुरेंना केले तडकाफडकी कार्यमुक्त
By admin | Published: July 08, 2017 12:34 AM