चरण वाघमारे : ८६१ कोटींचा प्रस्ताव सादर, आलेसूर येथील कार्यक्रमभंडारा : ग्रामवनातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी वनविभागाने ग्रामवन ही योजना अस्तित्वात आणली आहे. भंडारा जिल्ह्यात वनविभागाने १२४ ग्रामवन समित्या स्थापन करून उत्कृष्ट कार्य केले आहे .यासोबतच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तुमसर तालुक्यात सर्वाधिक कामे मंजूर झालेली आहेत. याचा फायदा ग्रामस्थांना मिळणार आहे. ग्रामवन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शन मिळणार असल्याने जळावू इंधनाचा प्रश्न मिटणार आहे. ग्रामवन ही योजना वनविभागाची सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.लेंडेझरी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आलेसूर येथे ग्रामवन जनजागृती कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक उपवनसंरक्षक पी.जी. कोडापे, चोपकर, मनोहर गोखले, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी वाघमारे यांनी वनविभागाच्या ग्रामवन विकासाकरिता ८६१ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो मंजूर करण्याकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून तो निधी खेचून आणण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. उमेश वर्मा यांनी ग्रामवनाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शनचा पुरवठा व सौर चुल वाटप करण्यात येईल. युवक युवतींना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, ज्या गावांमध्ये ग्रामवन समिती स्थापन झालेली आहे त्या गावांचा वनक्षेत्र ग्रामवन समितीला हस्तांतरीत करण्यात येणार असून जंगलांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामवन समितीची राहणार आहे. या जंगलातून मिळणारे उत्पन्न ग्रामवन समितीला देण्यात येणार असून निसर्ग पर्यटनाचा विकास करण्यासाठी चांदपूर, गायमुख, रावणवाडी, पिटेझरी या गावांचा शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सोबतच शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळावा यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तत्पुर्वी आमदार वाघमारे व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी वटवृक्षाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भंडारा वनविभागाने वनालगतच्या १२४ गावांचे ग्रामवनाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले असून त्याला हिरवी झेंडी मिळाली आहे. या कार्यक्रमांतर्गत वनविभागामार्फत प्रशिक्षण देऊन रोजगार प्राप्त केलेल्या युवक युवतींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मान्यवरांनी वनरक्षक ललीत उचिबगले व औषधी वनस्पती तज्ज्ञ यांनी लावलेल्या औषधी वनस्पती प्रदर्शनीला भेट दिली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ग्रामवन समितीच्या अध्यक्षांना ग्रामवन नोंदणी पत्र व एलपीजी गॅस तथा सौर कुंपणाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वनपरिक्षेत्राधिकारी मडावी, माकडे, सोशल मोबीलायझर ए.पी. येसनसुरे, वनपाल, वनरक्षक, वनमजूर तथा ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
‘ग्रामवन’ ही वनविभागाची सर्वोत्कृष्ट योजना
By admin | Published: March 06, 2017 12:17 AM