प्रकाश गजानन कोरे असे अपात्र घोषित उपसरपंचाचे नाव आहे. २०१७ मध्ये ते प्रभाग क्रमांक तीनमधून निवडून आले होते. त्यानंतर उपसरपंच झाले. आजोबा तुळशीराम रामा कोरे यांच्या नावाने अतिक्रमण नोंदवही गाव नमुना ई-१ मध्ये १९९५-९६ यावर्षी नोंद क्रं. ६ वर त्यांनी मुरमाडी तुपकर सा. क्र.२५ येथील गट क्रमांक २९१ मधील ०.०१ आर जागेवर घर बांधले होते, तर वडील गजानन तुळशीराम कोरे गट क्रमांक २९९ मध्ये ०.३९ हेक्टर आर पैकी ०.०१ हेक्टर आर जागेवर १९९८-९९ मध्ये तलाठी अतिक्रमण नोंदवही गाव नमुना ई-१ ला नोंद केली आहे. नऊ सदस्यीय या ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये सरपंच भाऊराव गिलोरकर व सदस्य किशोर मनगटे सदस्य पायउतार झाले होते. त्यानंतर उपसरपंच प्रकाश गजानन कोरे प्रभारी सरपंच म्हणून कार्यरत होते. चौकशीनंतर अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांनी प्रकाश कोरे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.
अतिक्रमणे नियमाकूल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत १९ जानेवारी रोजी प्रभारी सरपंच प्रकाश कोरे याच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली होती. त्यावेळी प्रकाश कोरे यांनी सुनील बकाराम चापले यांचे घर आहे तो गट क्रमांक ढोरफोडी असून, सदर गट ढोरफोडीकरिता कायम ठेवण्यात यावे आणि अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येऊ नये अशी नोंद ठरावात केली. प्रत्यक्षात सदर गटात सुमारे दहा घरे त्यातील काही ग्रामपंचायतीने दिलेली घरकुले आहेत. उपसरपंच प्रकाश कोरे यांचे त्याच्या आजोबा आणि वडिलांच्या नावेअतिक्रमण असताना त्यांनी आपले मत असे का नोंदविले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आता सुनील चापले यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण सादर केले आहे.