लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: एकाच चौकटीत असलेलं काम व दुबळेपणाची भावना दूर करण्यासाठी त्या चार महिला तलाठ्यांनी रेती चोरांवर अंकुश लावण्यासाठी एकी केली. जिल्ह्यातील बोथली रेती घाटावर जाऊन हल्ला बोल केला. वेगाने जात असलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. अशा असाधारण महिला शक्तीची ताकद अख्या मोहाडीने बघितली.शक्ती, शौर्य व बुद्धी याची प्रचितीचा अनुभव मोहाडी तालुक्यातील चार महिला तलाठ्यांनी दिला.बोथली, मोहगाव देवी, नेरी आदी रेतीघाटावरुन रेतीची चोरी होत असते. तीन दिवसापूर्वी नेरी घाटावर रेतीचे चार ट्रॅक्टर पकडले गेले होते. या कारवाईत नेरीच्या महिला तलाठी निरंजनी मदनकर यांनी पुढाकार घेतला होता. आपण महिला तलाठ्यांचे पथक बनवून रेती चोरांवर धाड घालायची ही कल्पना मोहगाव देवी येथील तलाठी सरस्वता झाडे यांच्या मनात आली. महिला तलाठी निरंजनी मदनकर, सरस्वता झाडे, प्रिया बांते व मीरा शेंडे यांनी नियोजन तयार केले. एका कर्मचाऱ्यांच्या वाहनाने बोथलीच्या रेती घाटावर हल्लाबोल केला. त्यावेळी एक टॅक्टर मजुरांच्या हाताने रेती भरत होता. तलाठ्यांना पाहताच त्या टॅक्टर चालकाने पळ काढला. पण, त्या महिला तलाठ्यांनी योजनेनुसार पुरुष तलाठी मुख्य रस्त्यावर उभे केले होते. या चारही महिला तलाठ्यांनी पळणाऱ्या विना क्रमांक असलेल्या टॅक्टरला गाठले. रेती भरलेला ट्रॅक्टर पोलिस स्टेशन वरठी येथे लावण्यात आले. ट्रॅक्टर चालक रोशन दुर्योधन भुरे यांचे बयान पोलिस स्टेशन मध्ये नोंदवून घेतले आहे. रेती चोरीची तक्रार वरठी पोलिस ठाण्यात करण्यात आली. दहा हजार रुपयाची रेती चोरी व एक लाख २० हजार शास्ती व महसूल दंड आकारण्यात आला आहे.कठीण कार्य करण्यास महिला अग्रणी आहेत. आम्ही ते सिद्ध केले. महिलांच्या आत्मसन्मानाला नवीन दिशा मिळाणार आहे.सरस्वता झाडेतलाठी, मोहगाव देवी
शाब्बास रे पठ्ठे; चार महिला तलाठ्यांनी केली रेती तस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 2:35 PM