पालांदूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी शासन, प्रशासन स्तरावरून नियमितपणे प्रबोधन केले जात आहे. लाखनी तालुक्यातील वाकल येथेसुद्धा ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य विभागाच्या प्रबोधनानंतर नागरिकांनी सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकाच दिवशी २२० नागरिकांनी लसीकरण मोहिमेला सहकार्य केले.
अनलॉक झाल्यानंतर लसीकरण मोहीम तीव्र करण्याकरिता प्रशासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. परंतु चुकीच्या समजुतीने नागरिक लसीकरणाला टाळाटाळ करीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात लसीकरणाच्या बाबतीत चुकीचे समज पसरलेले आहेत. त्यामुळे लसीकरणाकरिता वारंवार कॅम्प लावून सुद्धा नागरिक सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या अधिकाऱ्यांनी स्वतः उत्साह दाखवीत लसीकरणाकरिता प्रोत्साहन दिले. प्रसंगी काही ठिकाणी हजेरीसुद्धा लावली. जनप्रबोधन करीत लसीकरण करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला वाकल येथील सरपंच टिकाराम तरारे, डॉक्टर अमित जवंजाळ, तलाठी सुनील कासराळे आदींनी सहकार्य करीत गावात लसीकरण स्वतः उपस्थित राहून करून घेतले.