भंडारा : तालुक्यातील संगम पुनर्वसन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूरच्या वतीने शुक्रवारी मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गावातील ४५ ते ६० वर्षांवरील लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात ४५ ते ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे राज्य शासन व आरोग्य विभागामार्फत वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरणाची मोहीम सुरू असून, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर यांनी कोरोना लसीकरणासाठी कंबर कसली असून, शहापूर सर्कलमध्ये येणाऱ्या ग्रामीण भागात लसीकरणाचे शिबिर लावले जातात. तसेच शिबिर लावण्यापूर्वी गावात एक दिवसाअगोदर कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून, याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी जनजागृती करून नागरिकांना कोरोना लस घेण्याकरिता प्रोत्साहित केले जात आहे.त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३० एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील संगम पुनर्वसन या छोट्याशा गावात लसीकरणाचे कॅम्प लावण्यात आले. गाव छोटे असले तरी गावातील ४६ ते ६० वर्षांवरील गावातील स्त्री-पुरुषांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लसीकरणाचे रजिस्ट्रेशन करून कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश दिला.
लसीकरणाचे वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हिनाताई सलाम, डॉ. प्रशांत मदनकर, आरोग्य सहायक देवानंद बोरुले, आरोग्यसेवक प्रकाश मेश्राम, आरोग्य सेविका वीणा पवार, आशा सेविका वंदना शहारे, ग्रामसेवक नरेंद्र गजभिये, सरपंच शारदा मेश्राम, उपसरपंच वर्षा जगनाडे, ग्रामपंचायत सदस्य रागीना मेश्राम, मिथुन मेश्राम, सुशील चांदेकर, पोलीसपाटील संजय सार्वे, जयरतन मने, सीमा घारगडे इत्यादी उपस्थिती होते.