भंडारा : उन्हाची दाहकता वाढायला लागल्यापासूनच शहरासह ग्रामीण भागातही ग्रीन नेटची मागणी वाढली आहे. बहुतेकांच्या घरी ग्रीन नेटचे आच्छादन दिसते. त्यामुळे शहरातील बाजार परिसरात हिरवी सावली पसरल्याचा भास होत आहे. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी कसला तरी आडोसा असावा लागतो. यासाठी आज सर्वत्र ग्रीन नेटचा वापर होत आहे. अनेक घरांपुढे अंगण असते. या अंगणात अनेक शोभेच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. या झाडांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी संपूर्ण अंगणभर ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. अनेकांच्या घरी गॅलरीतून उन्हाचे झोत वाहत असतात. गॅलरीत कुलर लावूनही हवेच्या गरम झोतांनी वातावरण तितकेसे थंड होत नाही. त्यामुळे पूर्ण गॅलरीवरच ग्रीन नेट टाकून ती झाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्रीन नेट फुटाप्रमाणे विकत मिळते. उन्हाचे झोत कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरत असल्याने मागणी वाढली आहे.शहरात सर्वत्र व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये समोर ग्रीन नेट लावल्याचे दिसते. तसेच रस्त्याच्या कडेला मोठी छत्री लावून बसलेल्या विक्रेत्यांनीही छत्रीवर ग्रीन नेट पसरवून छत्रीच हिरवीगार केली आहे. सध्या शेतांमध्येही ग्रीन नेट शेड लावून शेती केली जात आहे. त्यामुळे ग्रीन नेटच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच दिसायलाही ते आकर्षक असल्याने फॅशन म्हणूनही त्याचा उपयोग होत आहे.(नगर प्रतिनिधी)
शहरावर पसरली हिरवी सावली
By admin | Published: May 30, 2015 1:00 AM