लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारातर्फे २६ मे रोजी घडणाऱ्या दोन भौगोलिक तसेच खगोलीय घटनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘शून्य सावली क्षण’ तर वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रग्रहण तसेच सुपरमून बद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन जागृती या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व अखिल भारतीय अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष व नेफडोचे जिल्हा सचिव आणि खगोल अभ्यासक प्रा.अशोक गायधने यांनी विविध वैज्ञानिक माहिती, प्राचीन व आधुनिक यूरोप व भारतीय खगोल वैज्ञानिकांनी अडीच हजार वर्षांपासून आजच्या काळापर्यंत केलेले प्रयत्न, फलज्योतिष्य शास्त्र तसेच खगोलशास्त्र पहिले एक असताना ते विलग कसे झाले, त्यावर आधारित अंधश्रद्धा कश्या तयार झाल्या, यावर त्यांनी दीड तास विविध सोदाहरणे देत तसेच प्रत्यक्ष कृती प्रयोगातून व चित्राद्वारा ऑनलाइन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मूलचंद कुकडे तर आभार जिल्हा उपाध्यक्ष एस. एस. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला मदन बांडेबुचे, रत्नाकर तिडके, डी.जी. रंगारी, शिवराम भोयर, प्रिया शहारे, प्रोफेसर बहेकार, कल्पना सांगोळे, वनिता बहेकार, मारोतराव कावळे, प्रशांत अनसाने, श्रीकांत वंजारी, यादव नेवारे, प्रकाश पचारे, प्रा.अनिल भुसारी, प्रा.गणेश कापसे, ओंकार चाचेरे, सर्वेश, अदिती बिंझाडे, अनिमिष नंदेश्वर, नरेश नवखरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अदृश्य होण्याचा अनुभव
ग्रीनफ्रेंड्सच्या व अंनिसच्या कार्यालयात 'शून्य सावली दिवस' निमित्ताने बरोबर १२ वाजून ६ मिनिटांनी सूर्य डोक्यावर असताना पायाखालची सावली तसेच दोन प्लास्टिक पाइपची व टेलिस्कोपची सावली काही क्षण अदृश्य होण्याचा अनुभव उपस्थित ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, अभा अंनिस व नेफडो जिल्हा शाखा भंडाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला. यावेळी प्रा.अशोक गायधने यांनी दुपारी तीन वस्तू दोन प्लास्टिक पाइप तसेच टेलिस्कोप अंगणात ठेवला त्यांची सावली वस्तुच्या तीनचतुर्थांश एवढी लांब होती तेव्हा सर्वांना दाखवून त्याची नोंद घेण्यात आली.