तुमसर शहर व तालुक्यात १४ ते २३ एप्रिल दरम्यान बंद घोषित करण्यात आला. ग्रामीण भागातही सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. ग्रामीण भागातील किराणा दुकाने ही शहराच्या किराणा दुकानांवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील किराणा दुकानांतील साहित्य संपले आहे. ग्रामीण भागातील नागरिक किराणा महिनाभराचे भरून ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा झाला आहे.
शहरातील व ग्रामीण भागातील किराणा दुकाने दिवसातून किमान दोन तास सुरू केल्यास किराणा सामानाची समस्या दूर होईल. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण परिसरातील नागरिक महिन्याचा किराणा साहित्य खरेदी करून ठेवत नाहीत. अनेक लोक दोन ते तीन दिवसांचे साहित्य घरी ठेवतात. अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे त्यांची तारांबळ उडत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरी किराणा साहित्य नसल्याने ते साहित्यांसाठी वणवण भटकत आहेत.